आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधी उभारण्याच्या टिप्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- सामाजिक कार्यांसाठी निधी मिळवणे हे मोठे आव्हान असते, मात्र कामाचे सूत्रबद्ध नियोजन तयार असल्यास निधी मिळवणे सहज होते. दात्यांना टिकवून ठेवणे, दानाची रक्कम वाढवण्यास प्रेरणा देणे आणि देण्याचा आनंद अनुभवण्यास देणे अशा विविध बाबींवर सल्लागार झाहिदा नुराणी यांनी मार्गदर्शन केले.
आस्था फाउंडेशनच्या वतीने शुक्रवारी (18 एप्रिल) हॉटेल कीज येथे ‘निधी उभारणे’ विषयावर आयोजित कार्यशाळेत त्या बोलत होत्या. या वेळी विविध समाजसेवी संस्थांचे पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. आस्थाचे अध्यक्ष गिरीश हंचनाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. नुराणी यांनी अमेरिकेतील विद्यापीठातून समाजशास्त्राची पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर 12 वष्रे समाजसेवा केली. त्यानंतर 19 वष्रे शिकागो येथील मर्सी रुग्णालयाच्या मर्सी फाउंडेशनचे कार्यकारी संचालकपद भूषवले. निधी उभारण्याच्या प्रमुखपदीही त्या होत्या.
नुराणी म्हणाल्या की, जेव्हा आपण दात्यांकडे निधी मागण्यास जातो तेव्हा त्यांच्या पैशाचे, दानाचे आपण नेमके काय करणार आहोत, याचे नियोजन आपल्याकडे असायला हवे. ते योग्य पद्धतीने अचूकरीत्या त्यांच्यासमोर मांडता यायला हवे. सेवेइतकाच निधी आवश्यक आहे, हे समजावून सांगायला हवे. वार्षिक निधी देणार्‍या दात्यांना पत्रव्यवहार आणि ई-मेलद्वारे धन्यवाद द्या. निधीतून होणार्‍या विविध कार्यक्रमांची माहिती द्या, असेही त्यांनी सांगितले. दाते मिळवणे, असलेले पुनरुज्जीवित करणे आणि निधीची रक्कम वाढवण्यासाठी प्रेरणा देणे हा महत्त्वपूर्ण भाग असल्याचे विशद करताना नुराणी म्हणाल्या की, या सर्व बाबींवर काम करणार्‍यांची र्मजी लक्षात घ्या. जेव्हा आपण निधी मागण्यासाठी जातो तेव्हा आपण जे कार्य निधीतून करणार आहोत, त्याचे महत्त्व समजावून सांगा. त्यासाठीचे अचूक पुरावे त्यांना सादर करा.
वर्षभरातील विविध खर्चांचेही नियोजन करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. दात्यांसाठी वर्षभरातून एकदा कार्यक्रमाचे आयोजन करा. हिशेब अचूक ठेवा. सातत्याने विविध मार्गांनी दात्यांना धन्यवाद देत राहा. यामध्ये पत्रातून, ई-मेलद्वारे, फोन करून कामांची माहिती कळवत राहा. कामांचे व्हिडिओ बनवून दाखवा, असा सल्लाही त्यांनी दिला. आस्थाच्या वतीने आशिष गर्दे, सुलतान अली कुडचीवाला यांची, तर स्वयंसेवी संस्थांतून स्वाती पाध्ये, ज्योती शितोळे, अंबिका टाकळकर, सुहास वैद्य यांची प्रमुख उपस्थिती होती.