आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रूरतेचा कळस: खादगाव शिवारात विषबाधेने 14 मोरांचा मृत्यू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाचोड- ज्वारीचे विषारी दाणे खाल्ल्यामुळे चार मोर व 10 लांडोरींसह तितर, कोकिळा, होले आदी शेकडो पक्षी मृत्युमुखी पडल्याची घटना पैठण तालुक्यातील खादगाव शिवारात शनिवारी घडली.
खादगाव येथील शेतकरी महादेव नाथू काकडे यांच्या शेतामध्ये शनिवारी पेरणी करण्यात येत होती. त्या वेळी त्यांना एक मृत मोर आढळला. परिसरात आणखी काही मोरांचे मृतदेह पडलेले आढळले. या प्रकाराने धास्तावलेल्या कोकडे यांनी तत्काळ सरपंच शिवाजी काकडे यांना या प्रकाराबाबत माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पाचोड ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी सहकाºयांसह घटनास्थळाकडे धाव घेतली. तिथे चार मोर, 10 लांडोरींसह अनेक तितर, होले, कोकिळा व इतर पक्षी मृतावस्थेत दिसून आले.
परिसरात पेरण्या सुरू असून अन्नाच्या आशेने पक्ष्यांचे थवे शेतात उतरत आहेत. नुकतीच उगवण झालेल्या पिकांचे नुकसान होत असल्यामुळे कोणी तरी खोडसाळपणाने हा प्रकार केला असावा, अशी शक्यता आहे. शेतातील ज्या झुडपामध्ये हे पक्षी पडले होते तिथे ज्वारीचे दाणे आढळले असून हे विषारी दाणे खाल्ल्यामुळेच या पक्ष्यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
घटनास्थळाचे चित्र अतिशय विदारक आणि माणुसकीला काळिमा फासणारे होते. नागरिकांनी आसपासच्या झुडपात शोध घेऊन पक्ष्यांचे मृतदेह जमा केले. पोलिसांनी ज्वारीच्या दाण्यांचे नमुने ताब्यात घेतले आहेत.
पक्षिमित्र चिंतित - पाचोड परिसर गर्द झाडांनी बहरला आहे. तिथे विविध प्रकारच्या पक्ष्यांचे अनेक वर्षांपासून वास्तव्य आहे. मात्र, रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळे या पक्ष्यांचे अस्तित्वच संपुष्टात येत असल्याने पक्षिमित्रांनी चिंता व्यक्त केली आहे. अतिशय क्रूरपणे या पक्ष्यांचा बळी घेणाºयांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी पाचोडचे सरपंच जयकुमार बाकलीवाल, खादगावचे सरपंच शिवाजी काकडे यांनी केली आहे.
कडक कारवाई करणार- या पक्ष्यांच्या हत्येचे गूढ उकलण्यासाठी पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एस. बी. काळे यांच्या देखरेखीखाली शवविच्छेदन करण्यात येणार आहे. अशा पद्धतीने पक्ष्यांचा जीव घेणाºयांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल. - बी. बी. झराड, वनपाल