आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एटीएममधून चोरी; 70 जणांची चौकशी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - डिकोडिंगद्वारे एटीएम मधून 16 लाख रुपये लंपास करणार्‍या आयएसएसएसडीबी कंपनीतील 70 कर्मचार्‍यांची मुकुंदवाडी पोलिसांनी शुक्रवारी चौकशी केली. शिवाय पोलिस कोठडीतील दोन्ही कस्टोडियनच्या मोबाइलवरील कॉल डिटेल्स रेकॉर्ड तपासण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.

संत गाडगेबाबा उद्यानासमोरील एटीएममधून सोमवारी (11 नोव्हेंबर) 16 लाख 17 हजार 100 रुपयांची रोकड लांबवली होती. त्यापैकी 15 लाख 13 हजार रुपयांचे बंडल भरलेली बॅग अज्ञात व्यक्तीने गुरुवारी चिकलठाणा पोलिस ठाण्यात फेकली. तपासी अधिकारी तथा सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी झाडाझडती घेण्यास सुरुवात केली. पोलिस कोठडीतील प्रकाश प्रधान व सुदाम ढाकरस यांनी गुन्ह्याची कबुली दिली नसल्यामुळे पोलिसांनी सीडीआरमार्फत तपासाचा मार्ग पत्करला आहे. चेन्नई येथील आयएसएसएसडीबी कंपनीला एटीएममध्ये रोकड जमा करण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. या कंपनीतील सर्वच कर्मचारी-अधिकार्‍यांची कसून चौकशी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. कॉन्स्टेबल दीपक इंगळे यांना नोटांची बॅग दिसण्यापूर्वी त्यांच्या मोबाइलवर आलेल्या अज्ञात कॉलचाही तपास सुरू आहे. कस्टोडियन गुन्हा कबूल करत नाहीत नसल्याचे आयुक्तांनी सांगितले.

गोपनीय कोड फुटल्याचा दावा
प्रकाश व सुदाम यांना 18 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी असून, तीन दिवसांनंतरही त्यांनी तोंड उघडलेले नाही. आपण दोघेही डायरीमध्ये गोपनीय कोड लिहून ठेवत होतो, त्यामुळे डायरीतूनच कोड ‘लिक’ झाल्याचे त्यांनी सांगितले. प्रमोद क्षीरसागर यांनी त्या दिशेनेही तपास करून बघितला आहे. अशा पद्धतीने एटीएममधील रोकड चोरीची घटना पहिल्यांदाच घडल्यामुळे सर्वच शक्यता तपासण्यात येत असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.