आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूतगिरणी चौकात एटीएम खाक, आज कॅश कॅसेट कापणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- गारखेडापरिसरातील सूतगिरणी चौकातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम रूमला बुधवारी सकाळी शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यात रूमसह एटीएम जळून खाक झाले. एटीएममधील ११ लाख ८९ हजार ४०० रुपये जळाले किंवा नाही हे रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही. या भीषण आगीत एटीएमच्या बाजूला असलेले एक दुकानही जळाले, तर वरच्या मजल्यावरील कार्यालय आणि शेजारी असलेल्या एका दुकानाला झळा लागून शटर जळाले. ही घटना बुधवारी सकाळी सात वाजून एकोणपन्नास मिनिटांनी सूतगिरणी चौकात घडली. घटनेची जवाहरनगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

सूतगिरणी चौकातील आनंद प्लाझाच्या कोपऱ्यावरील एसबीआयच्या एटीएमला बुधवारी सकाळी शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. केबिनमधील दोन्ही एसीमधील सिलिंडरचा स्फोट झाल्यानंतर आगीने आणखी रौद्ररूप धारण केले. त्यामुळे शेजारी असलेले शेषराव कडूबा राठोड यांचे यश मल्टिसर्व्हिसेस हे दुकान जळून खाक झाले. राठोड यांच्या दुकानातील संगणक, टेबल, खुर्च्या जळून खाक झाल्या, तर काचेचे दरवाजे तडकून फुटले. एटीएम शेजारी असलेल्या शिवशक्ती कलेक्शन या दुकानाचे शटर जळाले. या आगीत त्यांचे सुमारे ६० हजारांचे नुकसान झाले. एटीएमला लागलेल्या आगीच्या झळा वरच्या मजल्यापर्यंत पोहोचल्या. त्यामुळे एटीएम रूमच्या वरच्या मजल्यावर असलेल्या अॅडोरा फार्मास्युटिकल्स या कंपनीच्या कार्यालयाचे किरकोळ नुकसान झाले.

नाशिकवरूनपथक दाखल
सूतगिरणीचौकातील हे एसबीआयचे एटीएम ‘एफएसएस’ कंपनीकडे चालवण्यासाठी देण्यात आलेले आहे. मात्र संपूर्ण मालमत्ता ही एसबीआयच्याच मालकीची असल्याने त्यांच्या तक्रारीवरूनच यासंबंधीची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल केली जाऊ शकते. बुधवारी सकाळी एटीएमला आग लागल्यानंतर सर्वप्रथम १० ते १५ मिनिटे आतून फक्त धूर येताना दिसत होता. त्यानंतर आगीच्या मोठ्या ज्वाला आसमंतात दिसून आल्या.
अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणल्यानंतर एटीएम जळून खाक झाल्याचे निदर्शनास आले. मात्र एटीएम चॅनेल मॅनेजर जायभाये यांनी "कॅश कॅसेट'मधील रोख रक्कम जशीच्या तशीच असावी, असा विश्वास व्यक्त केला. मात्र आगीमुळे हे कॅश कॅसेट जाम झाले असल्याने ते गॅस कटरच्या साहाय्यानेच तोडून काढावे लागणार आहे. त्यानंतरच ११ लाख ८९ हजार रुपयांची स्थिती काय आहे, हे कळेल. त्यासाठी नाशिक आणि मुंबईवरून पथक येणार असल्याची माहिती जायभाये यांनी "दिव्य मराठी'शी बोलताना दिली. रक्कम जळाली असेल तर बँकेच्या मिसेलिनिअस खात्यातून ती ग्राहकांच्या खात्यावर वळती केली जाईल.

यामुळे रक्कम सुरक्षित
एटीएममध्येआग लागल्याची धाव मिळताच अग्निशमन केंद्राचे जवान तातडीने घटनास्थळी धावले. त्यांनी अवघ्या सात मिनिटांत आग विझविल्यामुळे एटीएम मशीनमधील ११ लाख ८९ हजार ४०० रुपये सुरक्षित राहिले. तसेच आगीच्या घटना घडू शकतात ही बाब लक्षात घेऊन एटीएम मशीनसाठी कॅश बॉक्स तयार करतानाच बॉक्सचा पत्रा जास्त जाडीचा ठेवला जातो. त्यामुळे हा बॉक्स अर्धातास आगीच्या विळख्यात सापडला तरी रक्कम सुरक्षित राहू शकते, अशी माहिती एटीएम मशीन्स तयार करणाऱ्या मुंबईतील तंत्रज्ञांनी दिली.

यूपीएसची बॅटरी जळाल्याचा अंदाज
एटीएमच्याकेबिनमधील दोन एसी, संगणक, यूपीएस जळून खाक झाले आहेत. यूपीएसच्या बॅटरीतून वीजपुरवठा सुरू असताना ही आग लागली असावी असा अंदाज एटीएमचे चॅनल मॅनेजर कैलास जायभाये यांनी व्यक्त केला. दरम्यान, या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने धाव घेऊन ही आग अवघ्या सात मिनिटांत आटोक्यात आणली. यानंतर जवाहरनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील तेलुरे यांनी फौजफाट्यासह धाव घेत घटनास्थळाची पाहणी केली.
असा आहे घटनाक्रम
७:४९ एटीएम सेंटरला आग
७:५१ तेथील स्थानिक नागरिकांचा अग्निशामक दलाला फोन
७:५२ पोलिसांना फोन
७:५६ सेंटर जळून खाक
७:५८ अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली.
८:०० पोलिस घटनास्थळी
८:0९ आगीवर नियंत्रण
८:२५ एटीएम अधिकारी घटनास्थळी दाखल