आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ATM Theft Case: Suspects Identified In Aurangabad

हॅकिंगद्वारे चोरलेली रोकड चिकलठाणा ठाण्यात फेकली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - स्टेट बँक ऑफ इंडियाचे (एसबीआय) चिंतामणी आर्केड येथील एटीएम ‘डिकोडिंग’द्वारे चोरलेल्या 16 लाख 17 हजार 100 रुपयांपैकी 15 लाख 13 हजारांची रक्कम पोलिसांना प्राप्त झाली आहे. त्यासाठी पोलिसांना मात्र फार पर्शिम घेण्याची गरज पडली नसून गुरुवारी (14 नोव्हेंबर) पहाटे अज्ञात व्यक्तीने स्वत:च चिकलठाणा पोलिस ठाण्याच्या संरक्षक भिंतीवरून आतमध्ये रोकड भरलेली बॅग फेकली. ‘नाइट’ करून घरी परतणारे पोलिस कॉन्स्टेबल दीपक इंगळे यांच्या नजरेस ही बॅग पडली आणि त्यांनी आपल्या वरिष्ठांना ही बाब कळवली. चोरीस गेलेल्या रकमेपैकी 1 लाख 4 हजार रुपये ‘गायब’ झाले आहेत.

संत गाडगेबाबा उद्यानासमोरील एटीएममधून सोमवारी (11 नोव्हेंबर) दुपारी अडीच वाजता अत्यंत शिताफीने रक्कम पळवण्यात आली होती. मुकुंदवाडी ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल आहे. एसबीआयने एटीएमचे संचालनाचे कंत्राट ईपीएसला (इलेक्ट्रॉनिक पेमेंट अँड सर्व्हिसेस) दिलेले आहे. शिवाय चेन्नई येथील आयएसएसएसडीबी या खासगी कंपनीद्वारे एटीएममध्ये रोकड भरण्याचे काम नित्यनियमाने केले जाते. या कंपनीसाठी काम करणारे कस्टोडियन प्रकाश प्रधान आणि सुदाम ढाकरस यांना बुधवारी पोलिसांनी अटक केलेली आहे. रोकड जप्त करण्यासाठी न्यायालयाने दोन्ही आरोपींना 18 नोव्हेंबरपर्यंत पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. दरम्यान गुरुवारी (14 नोव्हेंबर) अत्यंत नाट्यमयपणे अज्ञात व्यक्तीने चिकलठाणा पोलिसांच्या कंपाऊंड वॉलमध्ये रोकड भरलेली करड्या रंगाची बॅग फेकली. दोघे कोठडीत असताना तिसर्‍याच व्यक्तीने रक्कम फेकल्यामुळे चोरीमध्ये आणखी एकाचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले. पहाटे अंधाराचा फायदा घेऊन ही बॅग भिंतीच्या बाजूने जाणार्‍या रस्त्यावरून फेकली असावी असा अंदाज आहे. रात्री आठ ते सकाळी आठपर्यंत कर्तव्यावर हजर असलेल्या कॉन्स्टेबल दीपक इंगळे यांची नजर बॅगवर गेली. फेकणार्‍याचे नाव गोवण्यात येऊ नये आणि केवळ पोलिसांच्याच हाती लागावी म्हणून गुन्ह्यातील तिसर्‍या आरोपीने हे कृत्य केले. प्राप्त नोटांचा पंचनामा एमआयडीसी सिडको ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक सोनवणे यांच्यासमक्ष करण्यात आला. औरंगाबाद ग्रामीणच्या उपविभागीय पोलिस अधिकारी कल्पना बारवकर, मुकुंदवाडीचे पोलिस निरीक्षक जयकुमार चक्रे, चिकलठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक निर्मला परदेसी, तपासी अधिकारी तथा सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर आदींची पंचनाम्यावेळी उपस्थिती होती. दुपारी आरोपींनी गुन्हा कबूल केल्याचे पोलिस निरीक्षक चक्रे यांनी म्हटले आहे. मात्र तपासी अधिकारी क्षीरसागर यांनी मात्र इन्कार केला आहे.

हार्ड डिस्क गायब : सीटीटीव्हीचे फुटेज संरक्षित करणारे ‘पीसी कोर’ गायब असून, ती हस्तगत करण्यासाठी तसाप चक्रे फिरवावीच लागणार आहेत.