आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एटीएम चोराने लुटले चाळीस तोळे सोने

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शेजारी राहणारे युवक मुलींना त्रास देतील या धाकापायी 40 तोळे सोने चोरीची फिर्याद न देणा-या आजीबाईंनी आठ महिन्यांनंतर अखेर फिर्याद दिली. एटीएम मशीन फोडण्याच्या प्रयत्नात शेजारी राहणारा युवक पोलिसांच्या तावडीत सापडताच त्या ठाण्यात हजर झाल्या. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता आरोपीकडून गुन्ह्याची कबुली घेत एक इंडिका कारही जप्त केली. तसेच चोरीचे सोने विकत घेणा-या सराफांचा शोध सुरू केला आहे.
सिडको गुलमोहर कॉलनीत मुख्य रस्त्यावर असलेल्या युनियन बॅँकेचे एटीएम अक्षय चव्हाणने साथीदारांच्या मदतीने फोडण्याचा प्रयत्न केला. गस्तीवर असलेल्या पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले व गुन्हा दाखल केला. त्यापाठोपाठ सिंहगड कॉलनीत त्या युवकाच्या शेजारी राहणा-या अनिता सांडू आखाते (एन- सहा, साईनगर) यांच्या घरातून 14 जून 2012 ते 13 नोव्हेंबर 2012 या काळात पोटमाळ्यावरील गोणीत ठेवलेले 40 तोळे सोन्याचे दागिने चोरीस गेले होते. दिवाळीच्या दिवशी पूजेसाठी दागिने काढण्याचा प्रयत्न केला असता हा प्रकार लक्षात आला. शेजारी राहणा-या अक्षयवर त्यांचा संशय होता. मात्र, त्याच्या टोळीची दहशत पाहता त्या तक्रार देण्यास पुढे येत नव्हत्या.

दरम्यान, चोरीनंतर अक्षय व त्या साथीदारांनी गोवा, मुंबईवारी करीत पैशाची उधळण केली. त्याचबरोबर चोरीच्या पैशातून इंडिका (एमएच-20-बीएन-4150) खरेदी केली. शिवाय साथीदारांना तवेरा गाडी खरेदी करण्यासाठी पैसेही दिले. अचानक अक्षयकडे एवढा पैसा आला कसा याचा विचार शेजारी राहणा-या आजीबाई करीत होत्या. संशय असतानाही केवळ दहशतीपोटी त्या तक्रार देत नव्हत्या. अनिता आखाते यांचा एक मुलगा शहरातील विधी महाविद्यालयात प्राध्यापक असून तो शेजारीच राहतो. तर थोरल्या मुलाचे काही वर्षापूर्वी निधन झाले असल्याने सून व दोन मुलींसह त्या राहतात. पैठण तालुक्यात असलेली शेती पाहण्यासाठी त्या अधिकवेळ गावीच राहतात. परिवाराला या गुंडांच्या टोळीने त्रास देवू नये यासाठी त्या तक्रारीसाठी पुढे येत नव्हत्या.

आठ महिन्यानंतर तक्रार आणि गुन्हाही कबुल
1 फेब्रुवारी रोजी एटीएम मशीन फोडण्याच्या प्रयत्नात पकडलेल्या अक्षयची माहिती आजीबाई ना कळाली. या घटनेनंतर चार दिवस विचार करुन त्यांनी अखेर मंगळवारी (5 फेब्रुवारी) सिडको पोलिस ठाण्यात संबंधित टोळीविरुध्द तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हेगारांची चौकशी करताच त्यांनी गुन्ह्याची कबुली देत पैशाचा हिशोबही सादर केला आणि खरेदी केलेली कारही स्वाधीन केली. ही कामगिरी पोलिस उपायुक्त अरविंद चावरिया, पोलिस निरीक्षक हेमंत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत खटके, कॉ. सुखदेव जाधव, समाधान काळे, गणेश शिंदे यांनी केली असून या टोळीकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.