आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅट्राॅसिटी कायदा प्रभावी होण्यासाठी दलितांना ज्ञानास्त्र उचलावे लागेल!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दलितांवर रोजच अत्याचार होत आहेत. अॅट्रॉसिटी कायदा प्रबळ केला असला तरी त्याचा गैरवापरही सवर्णांतील प्रस्थापित मंडळींकडून वर्चस्व कायम राखण्यासाठी केला जातो. त्यामुळे हा कायदा जास्त प्रभावी होईल आणि त्याचा गैरवापर होऊ नये यासाठी भीमसैनिकांना ज्ञानाचे अस्त्र उचलावे लागेल, असे मत निवृत्त पोलिस महानिरीक्षक सुधाकर सुरडकर यांनी व्यक्त केले आहे. रविवारी शहरातील सिडको नाट्यगृहात आयोजित अॅट्राॅसिटी जनजागरण परिषदेत ते बोलत होते. या वेळी सर्वचवक्त्यांनी अॅट्राॅसिटी प्रभावीपणे राबवण्याची गरज व्यक्त केली.
नाट्यगृहात आणि बाहेरही गर्दी : यापरिषदेला प्रचंड गर्दी झाली होती. नाट्यगृह तर खच्चून भरले होतेच, शिवाय नाट्यगृहाबाहेरही मोठी गर्दी जमा झाली होती. या परिषदेत आमदार हरिभाऊ राठोड, माजी मंत्री गंगाधर गाडे, मानवी हक्क अभियानाच्या मनीषा तोकले, प्रा. जयदेव डोळे, जनता दलाचे अजमल खान यांनी विचार मांडले.
सुरडकर पुढे म्हणाले, औरंगाबाद ही बाबासाहेबांची कर्मभूमी आहे. इथूनच परिवर्तनाला सुरुवात करावी. मोर्चे, प्रतिमोर्चे नकोत. मुळात कोणावरही मोर्चे काढण्याची वेळच येऊ नये. कायद्याचे राज्य येईल तेव्हाच अशी परिस्थिती निर्माण होईल. आज बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गाने चालण्याची गरज आहे. बाबासाहेबांनी हिंसेचे समर्थन कधीच केले नाही. सुरुवातीला अस्पृश्यता निवारण कायदा, त्यानंतर नागरी संरक्षण कायदा आणि नंतर अॅट्राॅसिटी अॅक्ट आला. यामध्ये दलित आणि आदिवासींचा समावेश आहे. कायदा झाल्यानंतर जागृती वाढली. यामध्ये रेटा कायम राहिला तर शिक्षा होण्याचे प्रमाण वाढेल. अॅट्राॅसिटी अॅक्ट म्हणजे केवळ जातिवाचक शिव्या देणे असा गैरसमज निर्माण झाला आहे. याचाच सर्वाधिक गैरवापर होतो. मराठा समाजाच्या मोर्चांनी खेड्यांमध्ये दलित समाजामध्ये भीती निर्माण झाली आहे. मात्र ती अज्ञानापोटी आहे. या कायद्याचे ज्ञान मिळाले तर कोणालाही भीती वाटायची गरज नाही.

रात्रवैऱ्याची आहे जागते राहा
माजी मंत्री गाडे म्हणाले की रात्र वैऱ्याची आहे. राज्यात नवीन डावपेच आखले जात आहेत. दलित समाजाकडे मतांची भीक मागणारे नेते आज पाठीत खंजीर खुपसत अाहेत. तोकले म्हणाल्या की, ग्रामीण भागात दलित माणूस सरपंचाच्या खुर्चीवर बसत आहे. मात्र अनेकांना ते सहन होत नाही. भारतीय संविधान नाकारणारी ही माणसे आहेत, असे सांगत त्यांनी दलितांवर कसा अत्याचार केला जातो, याची माहिती दिली. तर अजमल खान यांनी जनजागरण परिषदेला आपला पाठिंबा असल्याचे सांगितले. या वेळी मेघानंद जाधव यांनी भीमगीते सादर केली, तर सुजाता सोनवणे यांनी आभार मानले.

मागास आहोत असे सांगून आरक्षण मिळत नाही
या वेळी डोळे म्हणाले की, दलितांवर अत्याचार वाढले आहेत. त्यामुळे या कायद्यात २६ जानेवारीपासून दुरुस्ती करून तो आणखी मजबूत करण्यात येत आहे. भारतात ‘जात’ जात नाही असे सांगून जातिव्यवस्थेचे समर्थन केले जाते. आरक्षण देण्याचा अधिकार संविधानाला आहे. मी मागास आहे असे म्हणून जर कुणी आरक्षणाची मागणी करत असेल तर संविधान आरक्षण देत नाही. दबाव आणून मागासलेपणाचा अधिकार मागत असाल तर त्याला संविधानाच्या अधिकाराचे बळ दिले पाहिजे. त्यासाठी दोन्ही समाजांतल्या लोकांनी कायद्याचे वाचन केले पाहिजे, असे मतही त्यांनी मांडले.

देशपातळीवर आंदोलन
यावेळी आमदार हरिभाऊ राठोड म्हणाले की, मराठा मोर्चांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र संविधान इतके मजबूत आहे की त्याला धक्काही लागू शकत नाही. येत्या काळात भटक्या विमुक्त, बारा बलुतेदार, बंजारा, आदिवासींचे आंदोलन देशभर उभे करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.

परिषदेत मांडले ठराव
या परिषदेत देशभर कायद्याची कडक अंमलबजावणी करावी यासह राज्यात अॅट्राॅसिटी खटल्याचा निकाल दोन महिन्यांत लागावा, नगर जिल्हा अॅट्राॅसिटीप्रवण क्षेत्र घोषित करून प्रतिबंधात्मक कारवाई करावी, सोशल मीडियाद्वारे जातीय तणाव निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करावी आदी ठराव घेण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...