आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अ‍ॅड.घाणेकरांवर गोळीबार : सीसीटीव्ही बंद; तपासाची 'तार' निसटली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घटनेनंतर कारची पाहणी करताना पोलिस. - Divya Marathi
घटनेनंतर कारची पाहणी करताना पोलिस.
औरंगाबाद - प्रख्यात वकील नीलेश घाणेकर यांच्यावर मंगळवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास संग्रामनगर उड्डाणपुलाजवळ दुचाकीवर आलेल्या दोघांनी गोळीबार करत पळ काढला. हल्लेखोरांनी झाडलेली एक गोळी घाणेकरांच्या उजव्या बाहीला स्पर्श करून गेली, तर दुसरी कारच्या समोरील काचाला लागली. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वार्‍यामुळे घटनास्थळापासून अवघ्या शंभर मीटर अंतरावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍याची वायर तुटली. त्यामुळे या प्रकरणातील तपासासाठी सर्वात महत्त्वाचा असलेला धागा पोलिसांच्या हातून निसटला आहे. हल्लेखोरांना शोधण्यासाठी पोलिसांना युद्धपातळीवर प्रयत्न करावे लागणार आहेत.

उड्डाणपूल परिसरातील अपघात आणि विपरीत घटनांना आळा बसावा यासाठी पोलिसांच्या पुढाकाराने येथे कॅमेरा बसवण्यात आला; पण नेमके घटनेच्या दिवशीच तो बंद असल्याने हल्लेखोरांच्या दुचाकीचा क्रमांक मिळणेही अवघड झाल्याचे पोलिस निरीक्षक कैलास प्रजापती यांनी सांगितले. दरम्यान, अ‍ॅड. घाणेकर यांनी (४७, रा. गुरुप्रसादनगर, बाळापूर शिवार) त्यांच्यावरील हल्ल्यामागे अ‍ॅड. स्मिता लेंडवे पाटील असल्याची तक्रार सातारा पोलिस ठाण्यात केली आहे. त्यावरून पाटील यांना मंगळवारी रात्री १.३० च्या सुमारास पोलिसांनी ताब्यात घेत सुमारे आठ तास कसून चौकशी केली. जुन्या वादातून हा प्रकार घडला आहे. गोळीबाराशी माझा काडीमात्र संबंध नाही. आपल्याविरुद्ध रचलेला कट असल्याचे पाटील यांचे म्हणणे आहे. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात महिला वकिलासह अन्य दोघांविरुद्ध प्राणघातक हल्ला आणि कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जालना रोडवरील कुशलनगर येथील कार्यालयातून मंगळवारी रात्री ११.२० मिनिटांनी घाणेकर एकटेच त्यांच्या स्कोडा कारने (एमएच २० एएस ३०२) निघाले. संग्रामनगर उड्डाणपुलामार्गे बाळापूर शिवारातील गुरुप्रसादनगर येथे जात असताना त्यांना पाठीमागून कारने (या गाडीचा क्रमांक घाणेकरांनी पोलिसांना दिला नाही) आलेल्या स्मिता पाटील यांनी बोलायचे आहे, असे म्हणत त्यांना थांबवले. या वेळी एमआयटी कॉलेजकडे जाणार्‍या वळण रस्त्यावर घाणेकर आणि पाटील हे दोघेही थांबले. आपल्यावर दाखल केलेला खंडणीचा गुन्हा मागे घ्या आणि मला पैसे द्या (रकमेचा उल्लेख घाणेकर यांनी केला नाही) अशी पाटील यांनी मागणी केली. तेव्हा घाणेकरांनी पैसे देण्यास तसेच गुन्हा मागे घेण्यास नकार दिला. त्यामुळे घाणेकर यांना धमकावत पाटील तेथून निघून गेल्या. यानंतर लगेचच मिनिटभरात पाठीमागून दुचाकीवर दोघे आले. या वेळी चालक असलेल्या घाणेकरांच्या कारची काच उघडलेली होती.

दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या एकाने खाली उतरत सात ते आठ फूट अंतरावरून घाणेकरांवर पिस्तूल रोखून गोळी झाडली; पण त्याचा नेम चुकल्याने गोळी घाणेकरांच्या उजव्या हाताच्या बाहीला स्पर्श करून गेली. याचदरम्यान, पिस्तूल रोखणार्‍या एकाच्या हाताला घाणेकरांनी झटका दिला. त्यामुळे त्याचे पिस्तूल जागेवरच लॉक झाले. या वेळी दुचाकीवर समोर गेलेल्या दुसर्‍याला आवाज दिल्याने सलीम नावाच्या व्यक्तीने घाणेकरांच्या कारच्या काचेवर गोळी झाडली. हा प्रकार घडल्यानंतर दोघांनी तेथून पळ काढला. यानंतर घाणेकरांनी सातारा पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली, असे घाणेकरांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यांच्या तक्रारीवरून सातारा पोलिस ठाण्यात कलम ३०७, १२० (ब) यानुसार गुन्हा दाखल झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त अमितेश कुमार, उपायुक्त वसंत परदेशी, सहायक पोलिस आयुक्त खुशालचंद बाहेती, बाबाराव मुसळे, गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, कैलास प्रजापती अन्य पोलिस ठाण्यांतील निरीक्षकांनीदेखील धाव घेतली. पुढील तपास पोलिस निरीक्षक कैलास प्रजापती करत आहेत.
...नंतरच पुढील कारवाई
गोळीबाराच्या प्रकरणात आरोप केलेल्या वकील महिलेची आम्ही चौकशी केली आहे. या प्रकरणात कितपत तथ्य आहे, याचा तपास केला जात आहे. सर्व बाजूंनी तपास केल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल. खुशालचंद बाहेती, सहायक पोलिस आयुक्त.

मी घरातच होते
मंगळवारी दिवसभर मी लायब्ररीमधे अभ्यास करत होते. रात्री साडे आठच्या सुमारास मी घरी परतले. यानंतर मैत्रिण घरी आली. रात्री थोड्यावेळ टिव्ही पाहिल्यानंतर मी झोपी गेले. माझा प्रकरणाशी संबंध नाही. अ‍ॅड.स्मिता लेंडवे पाटील

शार्प शूटरचे जबाब नोंदवले
विशेष पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक उन्मेष थिटे, गजानन कल्याणकर यांनी शहरातील आर्म अ‍ॅक्ट प्रकरणातील १० ते १२ जणांचे जबाब नोंदवले. विविध भागांतील गुन्हेगारांची धरपकड सुरू केली आहे. कारच्या ड्रायव्हर सीटखाली आणि पाठीमागील सीटच्या खाली पोलिसांना दोन गोळ्या सापडल्या. ७.५६ एमएम पिस्टलमधील या दोन्ही गोळ्या आहेत. त्या फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आल्या.

पाटील यांची रात्रभर चौकशी
सिडकोएमआयडीसी पोलिस ठाण्याच्या निरीक्षक निर्मला परदेशी यांनी रात्री दीड वाजता पाटील यांना बोलावून घेतले. त्यांची तब्बल आठ तास चौकशी केली. यानंतर आज सकाळी उपायुक्त परदेशी, सहायक पोलिस आयुक्त बाहेती, मुसळे, निरीक्षक आघाव, गौतम पातारे आणि सहायक पोलिस निरीक्षक अर्चना पाटील यांनीदेखील पाटील यांची चौकशी केली. त्यांना ठोस धागेदोरे हाती लागले नाहीत.

बनावाच्या दिशेने तपास
वरिष्ठपोलिस अधिकार्‍यांनी नाव प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले की, हा गोळीबार बनावाचा प्रकार असावा, असा संशय आहे. त्यामुळे त्या दिशेनेही आमचा तपास होणार आहे. शिवाय, अ‍ॅड. घाणेकर, अ‍ॅड. लेंडवे पाटील यांचे मोबाइल कॉल रेकॉर्ड्स अभ्यासले जाणार आहेत. त्यातून एखादा महत्त्वाचा दुवा सापडू शकतो. घटना घडली त्या वेळी परिसरात कोणी प्रत्यक्षदर्शी होते का, याचीही माहिती घेणे सुरू आहे.

जुना वाद ?
अ‍ॅड.पाटील यांनी घाणेकरांकडून २५ हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याप्रकरणी मार्च २०१५ रोजी मुकुंदवाडी ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. या प्रकरणाची सुनावणी बुधवारी खंडपीठात होती. सामंजस्यातून पाटील यांच्यावरील गुन्हा मागे घेण्याचे आश्वासनदेखील त्यांना मिळाले होते. पाटील यांच्यावर अत्याचार झाला आहे असे त्यांचे म्हणणे होते. त्याची तक्रार करण्यासाठी त्या दोनदा पोलिस ठाण्यात गेल्या होत्या. मात्र, घाणेकरांनी आश्वासन देत परत बोलावले होते, असे पाटील म्हणाल्या.