आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनैतिक संबंधात अडसर; महिलेच्या पतीचा खून ! मानवी सांगाड्याचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खुलताबाद- म्हैसमाळ परिसरात २५ एप्रिल रोजी सापडलेल्या मानवी सांगाड्याचे गूढ उकलण्यात पोलिसांनी यश आले असून अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या महिलेच्या पतीचा काटा काढण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी  मृताच्या पत्नीसह एका मौलवीविरुद्ध पोलिसांनी  खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना गजाआड केले आहे. बिस्मिल्लाबी (ह.मु. जलाल पिंपळगाव) व मौलवी मोहंमद वसीम मोहंमद सलीम अन्सारी (२९, रा. टाकळी लिप्टा, ता. कोपरगाव जि. अहमदनगर) या दोघांना अटक करण्यात आली.
 
असा रचला खुनाचा कट  
आरोपी मौलवी मोहंमद वसीम हा आधी मशिदीसाठी चंदा जमा करण्याचे काम करीत होता. वर्षभरापासून तो टाकळी लिप्टा येथील मदरशात मौलवीचे काम करीत होता. मृत शेख नूर आरोपी मौलवी मोहंमद वसीम यांनी चंदा जमा करण्याचे काम केले व बटाईने शेती केली.  या दरम्यान बिस्मिल्लाबी व मौलवी मोहंमद वसीम याचे प्रेमसंबंध वाढीस लागले.  आपल्या प्रेमसंबंधात पती शेख नूर याची अडचण नको म्हणून या दोघांनी त्याचा कायमचा काटा काढण्याचा प्लॅन  तयार केला.  वसीमने खुलताबाद येथील चुलत बहिणीकडून तुला शिलाई मशीन घेऊन देतो म्हणून ९ एप्रिल रोजी  पहाटे पाच वाजता शेख नूर शेख शब्बीरला दुचाकीवर बसून आठ वाजता खुलताबादला आणले.  नंतर फिरून येऊ असे म्हणून शेख नूर यास म्हैसमाळ येथील डोंगर परिसरात नेले.  आपल्या अंगातील स्वेटर काढून वसीमने ते शेख नूर यास पिशवीत ठेवण्याचे सांगितले.  शेख नूर स्वेटर पिशवीत  ठेवण्यासाठी वाकला असता  वसीमने  धारदार कोयत्याने शेख नूरवर मागून सपासप वार केले. तो गतप्राण झाल्याची खात्री झाल्यानंतर वसीम हा दुचाकीवरून  मृताची पत्नी बिस्मिल्लाबीकडे गेला व शेख नूरचा काटा काढल्यांचे सांगितले. 
 
उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू  यांनी दिलेली माहिती अशी की,  म्हैसमाळ येथील गट क्र. २१ मध्ये डोंगर परिसरात २५ एप्रिल रोजी  मानवी देहाचा सांगाडा (कवटी व हाडे) आढळून आला होता. पोलिसांनी घटनास्थळावरून हाडे, कपडे व  शेख नूर शेख शब्बीर (रा. सायगाव, ता. येवला, जि. नाशिक) अशा नावाचे आधारकार्ड मिळून आले होते.  पोलिसांनी तपासाची चक्रे  फिरवून माहिती हस्तगत केली असता शेख नूर हा १५ दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी मृताच्या नातेवाईकांकडून माहिती घेतली असता मृत शेख नूर याची पत्नी बिस्मिल्लाबी हिचे  मौलवी मोहंमद वसीम मोहंमद सलीम अन्सारी याच्याशी अनैतिक संबंध असून हा खून या दोघांनी मिळून केल्याचा संशय व्यक्त केला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघा आरोपींना ताब्यात घेऊन खुलताबाद पोलिसांच्या हवाली केले. त्यांची विचारपूस केली असता शेख नूर यांचा खून केल्याची कबुली दिली.  बिस्मिल्लाबी  व मौलवी मोहंमद वसीम मोहंमद सलीम अन्सारी विरुद्ध  गुन्हा दाखल करून अटक केली.
बातम्या आणखी आहेत...