आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावधान! तुमच्या खिशामधील शंभराची नोट बनावट असू शकते

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- सावधान!तुमच्या खिशातील १०० रुपयांची नोट बनावट असू शकते. गेल्या एक वर्षापासून शंभराच्या सुमारे अडीच लाख रुपयांच्या बनावट नोटा औरंगाबादेतील बाजारपेठेत फिरवणाऱ्या एका टोळीला मुकुंदवाडी पोलिसांनी अटक केली. या टोळीने दिलेल्या जबाबात ही बाब समोर आली. सागर ऊर्फ बंटी अशोक मगरे (१८), शेख आमेर शेख अब्दुल खुद्दूस (२०, हल्ली मुक्काम महालक्ष्मी चौक, सिडको, कामगार चौकाजवळ, मूळ गाव अंबड, जि. जालना) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. कामगार चौकाजवळील महालक्ष्मी चौकातील घरातून त्यांना सोमवारी अटक करण्यात आली.

बंटीला प्रेयसीसोबत लग्न करायचे होते. ही गोष्ट घरातील लोकांना मान्य नव्हती. त्यामुळे घरातून पैसे मिळणे बंद झाले होते. दोघांना खर्च करण्यासाठी पैसे लागत होते. म्हणून बंटी आणि आमेर यांनी शक्कल लढवत घरीच बनावट नोटा बनवल्या आणि त्या बाजारात चालवल्या.
एक वर्षापूर्वी या दोघांनी पहिली बनावट नोट एका दुकानदाराला दिली. त्यानंतर दोघांचाही आत्मविश्वास वाढला. एका वर्षात त्यांनी अडीच लाख रुपये बाजारात चालवले. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी सहा महिन्यांपासून दुचाकी चोरण्यास सुरुवात केली. आतापर्यंत
त्यांनी ११ महागड्या गाड्या चोरल्या.

यांनी रचला सापळा : मुकुंदवाडीपोलिस ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या पथकाला ही माहिती मिळताच त्यांनी महालक्ष्मी चौकातील या दोघांच्या घरावर छापा मारला आणि नोटा छापण्याचे प्रिंटर, शाई आणि दुचाकी जप्त केल्या. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक कल्याण शेळके, हारुण
शेख, राजेश बनकर, शोण पवार, सुनील जाधव, परशुराम सोनुने यांच्या पथकाने केली. उपायुक्त वसंत परदेशी, सहायक आयुक्त सुखदेव चौघुले आणि पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनीदेखील या आरोपींची चौकशी केली.

आरोपींना पोलिसांनी अटक करून आयुक्तांसमोर हजर केले. छायाचित्रात उपनिरीक्षक कल्याण शेळके, परशुराम सोनुने, शोण पवार, राजेश बनकर, हारुण शेख. छाया : मनोज पराती
अशा तयार होत होत्या शंभराच्या नोटा १००च्यातीन खऱ्या नोट्या एकाच वेळी स्कॅन करायच्या. त्यांची हुबेहूब छबी काढल्यानंतर त्यांची प्रिंट काढायची. एका बाजूने प्रिंट काढल्यानंतर ते दुसऱ्या बाजूने प्रिंट करत. प्रिंट काढून या नोटेला चोळामोळा करत, जेणेकरून ही नोट खरी वाटायला हवी. यासाठी स्टेशनरीच्या दुकानात मिळणाऱ्या एक्झिक्युटिव्ह बाँडचा कागद हे भामटे वापरत. खऱ्या नोटा कशा तयार करतात याची माहिती त्यांनी इंटरनेटवरून मिळवली होती. या नोटा हॉटेल, ठेले, पानटपऱ्या या ठिकाणी चालवत आतापर्यंत त्यांनी अडीच लाख रुपये खर्च केल्याचे
पोलिसांनी सांगितले. हे दोन्ही भामटे उच्चशिक्षित आहेत. यातील आमेर याने संगणकाचा कोर्स केला आहे. तो एका संगणकाच्या दुकानावर काम करतो. बंटी १२ वी पास आहे. त्याचे वडील बँकेत काम करतात. ५०० आणि एक हजार रुपयांची प्रत्येक नोट बँकेत तपासली जाते. पेट्रोल पंपावरील कर्मचारीही सत्यतेची खात्री पटल्याशिवाय अशा नोटा स्वीकारत नाहीत. त्यामुळे या भामट्यांनी १०० रुपयांच्या नोटा तयार करण्याचे ठरवले.

.