आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजपच्या यादीत सावेंचे औरंगाबाद पूर्वमधून नाव नसल्याने चर्चेला ऊत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- भाजपने शुक्रवारी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यात औरंगाबाद पूर्वमधून अतुल सावे यांचे नाव नसल्याने उलटसुलट चर्चेला ऊत आला आहे. या मतदारसंघात शिवसेनेचे प्राबल्य आणि मानसिकता लक्षात घेता सावे शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा आज दिवसभर होती. मात्र, सावे यांनी मी भाजपच्या यादीची वाट पाहत असल्याचे सांगितले.
दरम्यान, सावेंबाबत निर्णय न झाल्यास आपला उमेदवार तयार असावा यासाठी शिवसेनेतर्फे महापौर कला ओझा यांचा अर्ज दाखल केला जाणार आहे. सावेंचे नाव जाहीर झाल्यावर त्या माघार घेतील अशी रणनीती आखण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. औरंगाबाद पूर्वमधून भाजपकडून सावेंची उमेदवारी निश्चित मानली जात होती. त्यांनी वर्षभरापासूनच कामालाही सुरुवात केली होती. त्यामुळे पहिल्या यादीत त्यांचे नाव असणारच यावर त्यांचे समर्थकही ठाम होते. प्रत्यक्षात आज भाजपच्या यादीत त्यांचे तसेच संजय केणेकर यांचेही नाव नाही. सूत्रांच्या माहितीनुसार पूर्वमध्ये शिवसेनेला मानणा-या मतदारांची संख्या मोठी आहे. शिवाय शिवसेनेचे पदाधिकारी सोबत नसतील तर विजय कठीण आहे, असा सूर सावेंच्या गोटात आहे. त्यामुळे त्यांनी शिवसेनेच्या वरिष्ठांशी संपर्क साधला. याची माहिती मिळताच भाजपने त्यांच्याविषयीचा निर्णय थांबवला. दुसरीकडे भाजपने किशनचंद तनवाणी यांच्या रूपाने मोठा मासा गळाला लावल्याने त्याची परतफेड करण्यासाठी शिवसेनेने सावेंचा िवचार करण्याचे ठरवले, असेही सूत्रांनी सांगितले.