आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कचरा व्यवस्थापनावर आता सहा अधिकार्‍यांचे नियंत्रण, साफसफाईच्या मुद्दय़ावर एकता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - शहरातील कचरा वेळेवर उचलला जात नाही, कचराकुंड्या साफ केल्या जात नाहीत, नालेसफाई करण्यात आलेली नाही, फवारणी होत नाही, त्यासाठी लागणारे कीटकनाशक उपलब्ध नाही. यामुळे शहर स्वच्छतेचा बोजवारा उडाला असून शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आल्याचा सूर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांनी आळवला. यावर महापौर कला ओझा यांनी प्रशासनास तातडीने स्वच्छता मोहीम राबवण्याच्या सूचना दिल्या. कचरा व्यवस्थापनावर नियंत्रण ठेवण्यासाठी सहा अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महापालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी पार पडली. सभेत गिरजाराम हाळनोर यांनी सफाई वेळेवर होत नसल्याचे सांगितले. त्र्यंबक तुपे यांनी कचराकुंड्या साफ केल्या जात नसल्याने वॉर्डात दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याची सभागृहात माहिती दिली. फवारणीसाठी कीटकनाशक, सफाईसाठी पुरेसे कामगार उपलब्ध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नाल्यातील घाण नाल्याच्या कडेलाच टाकण्यात येत असून पावसामुळे ती घाण व गाळ पुन्हा नाल्यात जात आहे. त्यामुळे सफाईवरील खर्च वाया जात असल्याचे मुजीब खान म्हणाले. संजय चौधरी यांनी ठेकेदाराचे भले करण्यासाठी फवारणी आहे की शहरवासीयांचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी, असा प्रश्न उपस्थित केला. डॉ. खान नुझत तरन्नुम खान उमर यांनी नालेसफाई झालीच नसल्याचे सांगितले.

सहा अधिकार्‍यांची नियुक्ती
कचरा व्यवस्थापनावर नियंत्रण ठेवण्यासाठी सहा वॉर्डांत सहा अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे अधिकारी दररोज स्वच्छतेबाबत अहवाल सादर करणार आहेत. त्यामुळे कुठेही स्वच्छतेसाठी मजूर कमी पडणार नाहीत. फवारणी वेळेवर केली जाईल. त्यासाठी लागणारे कार्बनिक पावडर उपलब्ध झाले आहे. मजुरांची संख्या कमी असल्यास ती वाढवण्यात येणार असल्याची माहिती सुरेश पेडगावकर यांनी दिली.

शेख नासेर यांनी महापौरांवर झाडल्या प्रश्नांच्या फैरी
नासेर शेख म्हणाले की, सिल्लेखाना येथील कत्तलखान्यातील रक्त, मांस, घाण पाणी रस्त्यावर येत असून याबाबत पशुसंवर्धन अधिकारी डॉ. बी. एस. नाईकवाडे यांना माहिती दिली आहे, पण त्यांनी याची दखल घेतली नाही. उलट कत्तलखाना चालवणार्‍या लोकांना फोनवर माहिती देतात. त्यामुळे त्यांना तत्काळ हटवा. स्वच्छतेसाठी माझ्या वॉर्डात केवळ चार कर्मचारी आहेत, तर शेजारील सर्मथनगर वॉर्डात 17 मजूर काम करतात. नगरसेवकांचे तोंड पाहून मजूर देण्यात आले आहेत. माझ्या वॉर्डात 13 हजार लोकसंख्या असूनही केवळ चार मजूर काम करत आहेत. त्यात कत्तलखान्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आपण याबाबत अधिकार्‍यांना खुलासा विचारू शकत नसतील तर सभा बंद करा, अशा शब्दांत नासेर यांनी महापौरांची कानउघाडणी केली. डॉ. नाईकवाडे म्हणाले की, माझ्याकडे केवळ दोनच कर्मचारी आहेत, वाहन नाही. याबाबत आयुक्तांना माहिती दिली आहे.

वैद्यकीय अहवालात फरक का ?
पावसाळ्यात अस्वच्छतेमुळे शहरात मोठय़ा प्रमाणात साथीच्या रोगांनी डोके वर काढले आहे. दोन जणांना डेंग्यूची लागण झाल्याचा अहवाल खासगी डॉक्टरांनी दिला आहे, पण मनपाचे आरोग्य अधिकारी म्हणतात, रुग्णांना डेंग्यू झालाच नाही. तेव्हा वैद्यकीय अहवालात फरक कसा, असा प्रश्न प्रीती तोतला, राजू वैद्य आणि त्र्यंबक तुपे यांनी उपस्थित केला.