आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: वर्षभरात नारेगाव येथील कचरा डेपो होणार खताचे भांडार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नारेगाव कचरा डेपोची पाहणी करताना रागिनी जैन. - Divya Marathi
नारेगाव कचरा डेपोची पाहणी करताना रागिनी जैन.
औरंगाबाद: कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी मनपाकडे कोणतीच उपाययोजना नसल्याने स्वच्छ भारत अभियानात शहर पिछाडीवर राहिले आहे. त्यामुळे शासनाच्या अभियानात कार्यरत असलेल्या तज्ज्ञ रागिणी जैन यांच्या मार्गदर्शनाखाली नारेगावच्या कचऱ्याचे वर्षभरात खताचे भांडार तयार करण्यात येणार आहे. रविवारपासून कामाला प्रारंभ करण्यात आले आहे. आठ दिवसांत येथून घाण वास, डास आणि मच्छरांचा त्रास होणार नसल्याचे जैन यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. 

त्यांनी आज नारेगाव येथील कचरा डेपोला भेट देऊन डेपोतील कचऱ्याची सद्य:स्थिती आणि त्यावर करायच्या उपाययोजनेची पाहणी केली. वर्षभरातच यावर प्रक्रिया करून अवघ्या पंधरा लाख रुपयांच्या सर्पिशन मशीनने कचऱ्याचे वर्गीकरण करून त्यावर खत प्रक्रिया करण्याचाही आराखडा तयार केला. त्यानुसार महिनाभरात याचे परिणाम दिसणार असून सहा महिन्यांत पूर्ण डेपोचे रूपच बदलणार असल्याचे जैन यांनी सांगितले. पाहणी वेळी त्यांच्यासोबत घनकचरा कक्षप्रमुख विक्रम मांडुरकेही होते. यावेळी वैज्ञानिक पद्धतीने जैविक खत तयार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

शास्त्रशुद्धपद्धतीने कचरा टाकणार : डेपोत येणारा कचरा कुठे टाकायचा, त्याचे किती मोठ्या आकाराचे ढीग करायचे, प्रत्येक ढीग किती अंतरावर असायला हवा, ओळीने ढीग लावल्यानंतर त्यावर रासायनिक फवारणी कशी करायची, किती दिवसांनंतर कचऱ्याची पलटी मारायची याबाबत त्यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार वारंवार केलेल्या रासायनिक फवारणीनंतर साधारणत: तीन महिन्यांत कचऱ्याचे रूपांतर मातीत किंवा खतात होते. नंतर ही माती एकतर लेव्हलिंग करून जमिनीशी एकजीव केली जाते किंवा इतरत्र त्याचा खत म्हणून वापर केला जातो. 
 
पाण्याविना विझविणार चार दिवसांत आग 
डेपोत दररोज कचऱ्याला आग लागण्याचे प्रकार होत आहेत. विविध घटक पदार्थांची रासायनिक अभिक्रिया होऊन मिथेन वायू निर्माण होतो. त्यामुळे आपोआपच कचऱ्याला आग लागते. कधी काही व्यक्तींकडून आग लावण्यात येते. सध्या सुरू असलेली आग पाण्याच्या वापराविना चार दिवसांत आटोक्यात आणणार आहोत. यात नागरिकांना प्रवेश बंद केल्यास अधिक चांगला उपक्रम राबवण्यात येऊ शकतो. मनपाचा खर्चही कमी करणार असल्याचे जैन यांनी सांगितले. 
 
बातम्या आणखी आहेत...