आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: नॅनो टेक्नाॅलाॅजी पेंटमुळे भाविकांच्या पायांना थंडावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद: शहरातील गजानन महाराज मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भक्तांना आता उन्हाळ्यात प्रदक्षिणा मारताना पाय भाजण्याची भीती बाळगण्याचे कारण नाही. कितीही कडक ऊन असले तरी भाविकांचे पाय भाजू नयेत यासाठी नॅनो टेक्नाॅलाॅजीचा वापर असलेला पेंट प्रदक्षिणा मार्गासह मंदिराच्या मुख्य हॉलमध्ये लावण्यात आला आहे. 
 
गजानन महाराज मंदिरात येणाऱ्या भाविकांना प्रदक्षिणा मार्गावरील तापलेल्या ग्रॅनाइटचे चटके सहन करावे लागत होते. रोज ४० - ४१ अंश तापमानात प्रचंड तापलेल्या पृष्ठभागावर पाय ठेवणेही अशक्य आहे. प्रदक्षिणा मारणाऱ्या भक्तांना पाय पोळून घ्यावे लागत होते. यावर गजानन महाराजांचे एक भक्त लघुउद्योजक अजित मांडे यांनी मंदिर व्यवस्थापनाची परवानगी घेऊन मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावर एक विशेष पेंट वापरत या प्रश्नावर तोडगा काढला. 
 
नॅनोटेक्नाॅलाॅजीचा वापर : मांडेयांनी सांगितले की, नॅनो टेक्नॉलाॅजीच्या वापराने तयार करण्यात आलेल्या थर्मल इन्सुलेशन अँड हीट रिफ्लेक्टिव्ह पेंटचा मंदिरात वापर केला आहे. अॅक्रिलिक बेस असलेल्या या विशिष्ट रंगांचा वापर उष्णतारोधक म्हणून केला जातो. घराच्या छतावर अथवा पत्र्यावर हा पेंट वापरल्यास तापमानात १० ते १५ अंशांचा फरक पडतो. मांडे म्हणाले की, उन्हाळ्यात दुपारी दोन-तीन वाजेच्या सुमारास स्लॅबचे तापमान ६० अंशांच्या आसपास जाते. सूर्यप्रकाशातून निर्माण होणारी उष्णता परावर्तित करण्याचा गुण असलेल्या या पेंटमुळे हे तापमान ४५ ते ५० अंशांपर्यंत खाली येते. आतापर्यंत छतापुरता वापर होत असलेल्या या पेंटचा वापर प्रदक्षिणा मार्गावर करण्याचा निर्णय घेतला दोन दिवसांत हे काम पूर्ण केले. 
 
कोटिंगमध्ये संशोधन 
मांडे पावडर कोटिंगच्या क्षेत्रात काम करतात. सध्या नॅनो टेक्नॉलाॅजीचा वापर करून ते पर्यावरणपूरक प्री ट्रिटमेंटिंग फाॅर पावडर कोटिंग यावर संशोधन करत आहेत. 
 
बातम्या आणखी आहेत...