आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिसगाव बायपासला खड्ड्यांचा ‘फास’, रस्त्याची दयनीय अवस्था, उद्योजक, कामगार नागरिकांची गैरसोय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून जागोजागी खडी परसल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचाअडथळा पार पाडावा लागतो. - Divya Marathi
या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून जागोजागी खडी परसल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचाअडथळा पार पाडावा लागतो.
औरंगाबाद: वाळूज एमआयडीसीकडे जाणाऱ्या राज्य मार्ग क्रमांक 60 वर रहदारी वाढल्याने दररोज वाहतुकीची कोंडी होते. त्यासाठी पर्याय म्हणून तिसगाव बायपास रस्ता सोयीचा ठरत होता. मात्र, या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून जागोजागी खडी परसल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचाअडथळा पार पाडावा लागतो. यामुळे उद्योजक, कामगार आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. 
 
औरंगाबाद-अहमदनगर राज्य मार्गावरून वाळूज एमआयडीकडे जाताना सकाळ आणि सायंकाळच्या वेळी दररोज वाहतुकीची कोंडी होत असल्याने वाहनचालकांना जवळपास तास उशिर होतो. यावर उपाय म्हणून याच मार्गावरील कॅन्टॉन्मेंट रेल्वे पुलापासून तिसगाव, वडगाव कोल्हाटी मार्गे थेट वाळूज एमआयडीसीत जाणाऱ्या 9 मीटर रूंद आणि 1 किमी लांबीच्या रस्त्याचा पर्याय आहे. मात्र, या रस्त्याच्या देखभाल-दुरुस्तीकडे कुणाचेही लक्ष नसल्याने त्याची पार चाळणी होऊन हा रस्ताच होत्याचा नव्हता झाला आहे. तिसगाव फाटा ते वाळूज एमआयडीला जाणाऱ्या या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून खडी उखडली आहे. यामुळे वाहनचालकांना धुळीचा त्रास सहन करावा लागतो. 
 
66 लाख खर्चूनही रस्त्याची दैना 
कित्येकवर्षापासून रखडलेल्या या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने आमदार संजय शिरसाट यांच्या विकास निधीतून 14 लाख 95 हजाराचे मजबुतीकरण आणि डांबरीकरणाचे काम केले होते. या कामाचा कार्यारंभ आदेश 23 मे 2012 रोजी औरंगाबादेतील एका मजूर सहकारी संस्थेला देण्यात आले होते. यामध्ये दीड किलोमीटर रस्त्याचे काम करण्यात आले. मात्र, तरीही रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यानंतर या रस्त्याचे कामच झाले नाही. दुसरीकडे नाबार्डच्या अर्थसहाय्य योजनाअंतर्गत तिसगाव नदीच्या जोड रस्त्यावरील काँक्रीट पुलाचे काम करण्यात आले. यासाठी 51 लाख 91 हजार रुपये खर्च करण्यात आला. ठेकेदाराने पूल उभारला, पण पुलाला जोडणाऱ्या एका बाजूने जोड रस्त्याचे काम केलेच नाही.सार्वनजिक बांधकाम विभाग निधी नसल्याचे सांगत आहे, तर उर्वरित रस्ता झेडपीचा असल्याचे सिडको म्हणत आहे. रस्ता कामात सुरक्षाविभागाची अडचन असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणत आहे. 
 
असुरक्षित मार्गाला सुरक्षित पर्याय 
बाबा पेट्रोल पंपापासून नगर नाका, कॅन्टॉन्मेंट रेल्वे पूल ते वाळूज एमआयडीसीपर्यंतचा रस्ता खूपच असुरक्षित बनला आहे. औरंगाबादपासून वाळूज एमआयडीसी हे अवघे 6 किलोमीटरचे अंतर आहे, पण ते पार करण्यासाठी वाहनधारकांना एक ते दीड तास लागतो. वेळ तर जातोच, प्रसंगी अपघातही होतात. या रस्त्याला दुसरा पर्यायी रस्ता म्हणजे तिसगाव बायपास. 1988 मध्ये मंजूर झालेल्या विकास आराखड्यात तिसगाव फाटा ते वडगाव कोल्हाटीमार्गे थेट एमआयडीसीसाठी रस्ता प्रस्तावित होता. हा रस्ता नव्याने तयार केल्यास औरंगाबादहून एमआयडीसीकडे जाणाऱ्यांची गैरसोय कायमची दूर होऊ शकेल. 
 
असा येईल खर्च 
दोन्ही बाजूने रस्त्याचे एकूण क्षेत्रफळ, लांबी आणि रुंदी काढून या परिसरातील जमिनीच्या प्रचलित दरानुसार जमीनमालकांना मोबदल्यापोटी सुमोर 38 कोटी रुपये द्यावे लागतील. तर रस्त्याच्या बांधकामासाठी किमान 12 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मोबदला आणि रस्ता बांधकाम मिळून सुमारे 50 कोटी रुपयांमध्ये प्रशस्त आणि मजबूत रस्ता होऊ शकतो. तिसगाव, वडगाव कोल्हाटी आणि परिसरातील जमीनमालक भूसंपादनास तयार आहेत, पण मोबदला चांगला मिळाला पाहिजे, एवढीच त्यांची रास्त अपेक्षा आहे. तिसगाव रस्त्याचे रुंदीकरण आणि मजबूतीकरण करून पक्का रस्ता तयार केल्यास वाळूज औद्योगिक वसाहतीमधील उद्योजक, कामगार तसेच तिसगाव, वडगाव कोल्हाटी, साजापूर, रांजणगाव, घाणेगाव, धरमपूरसह अन्य गावातील लोकांसाठी सोईचा ठरू शकतो. 
 
20 वर्षांपासून प्रतीक्षा 
एकदा विकास आराखडा मंजूर झाल्यानंतर त्याच्या अंमलबजावणीसाठी 20 वर्षांचा कालावधी लागतो. राज्य शासनाच्या नगररचना विभागाने 1988 मध्ये शहरालगत असलेल्या 18 खेड्यांचा विकास आराखडा तयार केला होता. 1991 मध्ये तो मंजूर झाला. त्यानंतर अंमलबजावणीसाठी 20 वर्ष लागली. आता पुन्हा नव्याने विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, आधीच्या आराखड्यामद्ये कामे झालेली नसल्यास त्याचा नवीन आराखड्यात समावेश होतो. अगोदरची 20 वर्ष गेली, किमान आता तरी या रस्त्याचे काम मार्गी लागले पाहीजे, असे नागरिक म्हणत आहेत. छावणीच्या रेल्वेपूलापासून तिसगावकडे जाणाऱ्या या मार्गावर जागोजागी खड्डे पडलेले आहेत. रस्त्याचे रुंदीकरण आणि मजबुतीकरण केल्यास एमआयडीसीकडे जाणारा हा पर्यायी रस्ता ठरू शकतो.
 
ही समस्या गंभीर आहे, पण वाळूज एमआयडीसी परिसरातील काही रस्ते जिल्हा परिषदेच्या मालकीचे आहेत. आम्ही एमआयडीसी ते वडगाव कोल्हाटी, तिसगाव चौफुलीपासून पुढे गावापर्यंत एक किलोमीटरचे रुंदीकरण केले आहे. काही शेतकऱ्यांनी मोबदल्याचा प्रश्न उपस्थित करत न्यायालयात दाद मागितल्याने काम रखडले आहे.- आशतोष वुईके, प्रभारीसहाय्यक मुख्य नियोजनकार, सिडको 
 
रस्त्याच्या कामासाठी 15 लाख रुपये मंजूर झाले आहेत. येत्या आठ दिवसांत काम सुरू करणार आहोत. -संजय शिरसाट, आमदार 
 
सिडकोने मोबदला देता भूसंपादन केले. तिसगाव चौफुली ते ब्रीज हा एकूण 3 किलोमीटरचा रस्ता आहे. चौफुलीपासून गावापर्यंत एक किलोमीटर रस्ता सिडकोच्या अख्त्यारित येतो. सिडकोने मावेजा देता भूसंपादन केल्याने चौफुलीपासून ते गट क्रमांक 245 पर्यंत सहा ते सात शेतकऱ्यांनी न्यायालयात दाद मागितली आहे. त्यामुळे काम रखडले आहे. हा रस्ता झाला तर आसपासच्या गावकऱ्यांची तसेच एमआयडीसीकडे जाणाऱ्या कामगारांपासून उद्योजक, विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचा प्रश्न सुटेल. -कौशल्या कसुरे, सरपंच, तिसगाव 
 
मुळात हा ग्रामीण रस्ता आहे. त्याच्या दोन्ही बाजूने एक किलोमीटरपर्यंत जमिनीवर लष्कराची मालकी आहे. रस्त्याची देखभाल दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. काही वर्षांपूर्वी त्यांनी हा रस्ता तयारदेखील केला होता. - उमेश वाघमारे, सहायक अभियंता, छावणी परिषद 
 
हा रस्ता प्लॅनिंगमध्ये आहे. यासाठी केंद्रीय सुरक्षादलाशी आमचा पाठपुरावा सुरू आहे. लवकरच या रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. -चंद्रकांत खैरे, खासदार 
औरंगाबाद  
बातम्या आणखी आहेत...