आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाझर तलावात बुडून तीन मित्रांचा मृत्यू; रांजणगाव शेणपुंजी परिसरातील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तलावातील तरंगणारे मृतदेह बांबूच्या साहाय्याने काढताना अग्निशमन दलाचे जवान. घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. - Divya Marathi
तलावातील तरंगणारे मृतदेह बांबूच्या साहाय्याने काढताना अग्निशमन दलाचे जवान. घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती.
वाळूज- शाळेला सुट्या लागल्यामुळे दुपारचे जेवण आटोपून नुकतीच खरेदी केलेल्या रेंजर सायकलवर एकाच वसाहतीमधील तिघे मित्र फेरफटका मारण्यासाठी शेणपुंजी रांजणगाव परिसरातील पाझर तलावाजवळ गेले. त्यांना पोहण्याचा मोह आवरता आला नाही. तिघांनी एकापाठोपाठ उड्या घेतल्या आणि रसायनयुक्त पाणी असलेल्या तलावामध्ये त्यांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना ५ मे रोजी घडली, पण ७ तारखेला उघडकीस आली. या घटनेमुळे जोगेश्वरी गावावर शोककळा पसरली आहे. राहुल सुभाष साबळे(१४), दीपक संजय अहिरे (१३) आणि प्रकाश विजय राजपूत (१३, सर्व रा.जोगेश्वरी, ता. गंगापूर) अशी मृतांची नावे आहेत. तिघेही मित्र जोगेश्वरीत राहत होते. दीपक अहिरे याने काही दिवसांपूर्वी सेकंड हँड रेंजर सायकल खरेदी केली होती. या सायकलवर ट्रिपल सीट बसून ते ५ मे रोजी दुपारी पाझर तलावाकडे गेले होते. संध्याकाळ झाली तरी ते परतले नाही म्हणून त्यांच्या आई-वडिलांनी एकमेकांच्या घरी आणि नातेवाइकांकडे विचारपूस केली. मात्र त्यांचा थांगपत्ता लागत नसल्यामुळे त्यांचे अपहरण झाल्याची शंका उपस्थित करून पालकांनी शनिवारी वाळूज एमआयडीसी पोलिसांत तक्रार दिली होती. 
 
तीन दिवसांचा शोध संपला... : शुक्रवारी घराबाहेर पडलेली ही मुले अद्यापही परतली नसल्यामुळे पालकांची चिंता वाढली होती. तसेच काही दिवसांपूर्वी दोघा भगिनींचे नरबळी देण्याच्या उद्देशाने नाट्यमयरीत्या अपहरण केले होते. पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्या मुलींची सुटका झाली. ही घटना ताजी असल्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. ते रात्रंदिवस मुलांचा शोध घेत होते. 
 
रविवारी सकाळी वाजेच्या सुमारास रांजणगाव येथील पाझर तलावात तिघांचे मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस निरीक्षक नाथा जाधव, तपासी अधिकारी फौजदार ताहेर पटेल, अमोल देशमुख, जमादार बाळासाहेब आंधळे, वसंत शेळके यांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाला पाचारण करून दोन तासांनंतर मृतांना बाहेर काढण्यात आले. 
 
सायकल मात्र गायब : ज्या सायकलवर बसून तिघे गेले होते,त्यांचे तलावाबाहेर कपडे आणि चपला आढळून आल्या. पण सायकल मात्र गायब झाली. सायकलचा शोध लागला म्हणजे या मागचे गूढ पुढे येईल असे मृतांच्या नातेवाइकांचे म्हणणे आहे. शवविच्छेदन अहवालामध्ये नाकातोंडात पाणी गेल्यामुळे मृत्यू झाल्याचे कारण पुढे आले आहे, असे फौजदार पटेल यांनी सांगितले. 
 
शोकाकूल वातावरणात अंत्यविधी : तिघा मित्रांपैकी जोगेश्वरी गावातील स्मशानभूमीमध्ये राहुल दीपकवर अंत्यसंसकार करण्यात आले. तर प्रकाशवर त्याच्या मूळगावी पेंडापूर ता. गंगापूर येथे अंत्यविधी करण्यात आला. 
 
दोन तासांनंतर मृतदेह काढले बाहेर 
तलावातील पाण्याचा अनेक वर्षांपासून वापर होत नसल्यामुळे तलावात गाळ साचल्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांनी सुरुवातीला हवा भरलेल्या ट्यूबला दोरखंड बांधून तरंगणारे शव काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात यश येत नसल्यामुळे १० ते १५ फूट लांबीच्या बांबूच्या साहाय्याने मृतदेह बाहेर काढण्यासाठी त्यांना दोन तास लागले.
 
रसायनयुक्त पाण्यामुळे प्रेते सडली 
साधारण २० ते २५ फूट खोल असणाऱ्या तलावातील पाण्यामध्ये लगतचे अनेक कारखानदार रसायनयुक्त पाणी या तलावात टँकरद्वारे आणून टाकतात. त्यामुळे पाण्याचा उग्र वास येतो. पाण्यात पोहण्यासाठी उतरलेल्या मुलांचा बुडून मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. मृतांच्या शरीरावर फोड आले होते. 
 
 
बातम्या आणखी आहेत...