आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद : भांगसीमाता गडावरून पडून विवाहितेचा संशयास्पद मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद (दौलताबाद) : भांगसीमाता गडावर पतीसोबत दर्शनासाठी गेलेल्या एकवीस वर्षीय विवाहितेचा गडावरून पडून संशयास्पद मृत्यू झाला. शनिवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. शीतल रामनाथ फटांगडे (रा. माळीवाडा) असे मृत विवाहितेचे नाव आहे. दरम्यान, रामनाथ यानेच चारित्र्यावर संशय घेऊन गडावरून ढकलून दिल्याचा आरोप शीतलच्या वडिलांनी केला आहे.
 
दौलताबाद पोलिसांनी रामनाथला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. खुलताबाद तालुक्यातील शीतलचा (२०) विवाह माळीवाडा येथील रामनाथ दत्तू फटांगडे (२४) याच्यासोबत ३० एप्रिल २०१६ रोजी झाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामनाथ शीतलचे काही महिन्यांपासून वाद सुरू होते.
 
सतत उडणाऱ्या खटक्यांमुळे शीतल माहेरी गेली होती. परंतु दोन्हीकडील कुटुंबांनी समेट घडवून आणला होता. शनिवारी सकाळी शीतल रामनाथ रुग्णालयात उपचार घेत असलेल्या आजीला भेटण्यासाठी गेले होते. परंतु रामनाथने शीतलला भांगसीमाता गडावरील देवीच्या दर्शनासाठी घेऊन गेला. काही वेळानंतर शीतल गडावरून पाय घसरून खाली पडली, असे तिच्या कुटुंबीयांना फोनवरून सांगितले.
 
या घटनेचे वृत्त कळताच दौलताबाद पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे, उपनिरीक्षक मांटे पथकाने घटनास्थळी भेट दिली. गंभीर जखमी झालेल्या शीतलला घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. शीतलचे वडील हरिदास बनसोडे यांनी रामनाथ त्याचा भाऊ लक्ष्मण यांच्याविरूध्द तक्रार दिली. पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवला असून, पोलिस निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे तपास करत आहेत. 
 
घाटी रुग्णालयात काही काळ तणाव... 
शीतलच्या मृत्यूनंतर घाटी रुग्णालयाच्या शवगृहाबाहेर काही काळ तणाव निर्माण झाला होता. रामनाथ यानेच तिला गडावरून खाली ढकलल्याचा आरोप तिच्या नातेवाइकांनी केला. अनुचित प्रकार घडू नये म्हणून दौलताबाद पोलिसांनी रामनाथला आधीच ताब्यात घेतल्याने परिस्थिती शांत झाली. 
बातम्या आणखी आहेत...