आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाळ उपसा केल्यास127 विहिरी भागवतील शहरवासीयांची तहान;जुन्या विहिरींच्यास्वच्छतेसाठी आयुक्तांची हाक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शहर परिसरात १२७ जुन्या विहिरी आहेत. मात्र, वापर झाल्याने त्यांचा कचरा टाकण्यासाठी वापर केला जातोय. त्या स्वच्छ करण्यासाठी मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी साद घालताच उद्योजकांची संघटना सीएमआयएने पुढाकार घेत सिडको एन-६ मधील विहिरीच्या स्वच्छतेचे काम हाती घेतले. विहिरीतील गाळ उपसला जाणार असून हे पाणी पिण्यायोग्य करण्यासाठी येथे आरओ प्लांट बसवण्यात येणार आहे. खुल्या जागेत चिमुकल्यांसाठी बाग फुलवणे, ज्येष्ठांसाठी बाकडे टाकणे तसेच जॉगिंग ट्रॅक उभारण्याचा निर्धार सीएमआयएने केला आहे.
 
सीएमआयएचे एक शिष्टमंडळ नुकतेच काही मागण्यांसाठी मनपा आयुक्त मुगळीकर यांना भेटण्यासाठी गेले होते. या वेळी मुगळीकर यांनी शहरातील पाण्याच्या समस्येचा मुद्दा मांडला. शहरात १२७ प्राचीन विहिरी आहेत. त्यांची स्वच्छता करून हे पाणी पिण्यासाठी वापरले तर काही प्रमाणात टंचाई दूर होईल, असे मुगळीकर म्हणाले. सीएसआरच्या माध्यमातून हे काम करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सीएमआयएने एका विहिरीची स्वच्छता करण्याची तयारी दर्शवली. लगेच शनिवारी या कामाची सुरुवातही झाली. 
 
साईनगरात शुभारंभ : आयुक्तांनीसुचवल्याप्रमाणे सीएमआयएने सिडको एन-६ येथील साईनगरातील एका विहिरीच्या स्वच्छतेच्या कामाचा शुभारंभ केला. सीएमआयएचे सचिव दुष्यंत पाटील म्हणाले, आम्ही आयुक्तांच्या हाकेला प्रतिसाद देत लगेच कामाला लागलो. पालिकेच्या खुल्या भूखंडातील ही विहीर अनेक दिवसांपासून वापराविना पडून होती. विहिरीत कचरा आणि गाळ जमा झाला होता. गाळ उपसून पाण्याची तपासणी केली जाईल. ते पिण्यायोग्य नसेल तर आरओ प्लांट बसवला जाईल. विहिरीत मोटार बसवून पाणी टाक्यांमध्ये जमा केले जाईल. टाक्यांना तोट्या लावून ते नागरिकांना वापरता येईल. सोबतच परिसराचा कायापालट केला जाणार आहे. बाग फुलवणे, जॉगिंग ट्रॅक, बाकडे, विहिरीवर लोखंडी जाळी आदी कामे दोन महिन्यांत पूर्ण केली जातील. याप्रसंगी महापौर भगवान घडामोडे, उपमहापौर स्मिता घोगरे, नगरसेवक राजगौरव वानखेडे, शिवाजी दांडगे, अब्दुल नाईकवाडे, गुरुप्रीतसिंग बग्गा, ऋतीश मिश्रा, नितीन गुप्ता परिसरातील नागरिक उपस्थित होते. 
 
चार विहिरींची सफाई 
आयुक्त मुगळीकर म्हणाले, १२७ विहिरींची लोकसहभागातून स्वच्छता करून यातील पाणी पिण्यायोग्य केले जाणार आहे. आवश्यक त्या ठिकाणी आरओ प्लांट बसवले जातील. पाण्याची उपलब्धता पाहून ते विकून पालिकेला महसूलही जमवता येऊ शकतो. शुक्रवारी गणेश कॉलनी आणि दमडी महाल परिसरात दोन, तर शनिवारी साईनगरातील एक विहीर स्वच्छ करण्याचे काम सुरू झाले. रविवारी समर्थनगरातील विहिरीचे काम हाती घेतले जाईल. 
साईनगरातील एका विहिरीच्या स्वच्छतेच्या कामाचा शुभारंभ झाला. 
बातम्या आणखी आहेत...