आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादच्या वकिलांना सेंधव्याजवळ लुटले

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिरपूर - इंदूरहून शिरपूरकडे येणा-या औरंगाबाद येथील उच्च न्यायालयातील दोन वकिलांना चोरट्यांनी सेंधव्याजवळ मारहाण करून लुटल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. या मारहाणीत जखमी झालेल्या वकिलांवर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
औरंगाबाद उच्च न्यायालयातील अ‍ॅड. एस.आर. पळणीकर व अ‍ॅड. सुधीर पाटील हे दोघे जण शनिवारी इंदूर येथून काम आटोपून कारने (एम.एच 20 डी. सी 6233) शिरपूरकडे परत येत होते. मध्य प्रदेशातील सेंधवा शहरापुढे अ‍ॅड. पाटील यांना झोप अनावर झाल्याने त्यांनी गवाडी (ता. सेंधवा) गावाजळ असलेल्या पेट्रोल पंपाजवळ कार थांबवली. दोघेही कारमध्ये झोपले असताना मध्यरात्री अडीच ते तीन वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी खिडकीच्या काचेवर ठोकल्याने त्यांना जाग आली.
अ‍ॅड. पळणीकर यांनी दरवाजा उघडताच चोरट्यांनी चाकूसारख्या धारदार शस्त्राने त्यांच्यावर वार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी, अंगठी, खिशातील रोकड मिळून सुमारे 40 हजारांचा ऐवज व कारची चावी घेऊन चोरटे पसार झाले. त्यानंतर अ‍ॅड. पळणीकर यांनी औरंगाबाद येथे घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर तेथून तातडीने सूत्र हलून तासाभरात शिरपूरचे पोलिस निरीक्षक संभाजीराव पाटील व सहकारी घटनास्थळी पोहोचले. येथील अ‍ॅड. ललित महाजन यांनी त्यांना शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. जिल्हा पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी रविवारी सकाळी अ‍ॅड. पळणीकर यांची भेट घेऊन विचारपूस केली. याबाबत सेंधवा ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.