आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad Airport Airplane Landing Issue, News In Marathi

धावपट्टीवर कुत्रे, उतरणाऱ्या विमानाची पुन्हा भरारी, विघ्न टळले!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- चिकलठाणाविमानतळाच्या धावपट्टीवर हुंदडणाऱ्या कुत्र्यामुळे बुधवारी लँड होता होता विमानाला पुन्हा हवेत झेप घ्यावी लागली. कुत्र्याला हाकलल्यानंतर विमान पुन्हा उतरले; पण अचानक झालेल्या या प्रकाराने विमानातील दोन आमदारांसह १३० प्रवासी गोंधळून गेले. मुंबईहून आलेल्या एअर इंडियाच आयसी ४४१ विमानाबाबत घडलेल्या प्रकारामुळे विमानतळ सुरक्षेचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मुंबईहून दुपारी वाजता निघालेले विमान औरंगाबादेत पाच वाजता आले. पूर्वेकडून धावपट्टीवर ते उतरत होते. चाके धावपट्टीवर टेकणार असे वाटत असतानाच अचानक विमानाने वेग घेतला आणि ते झपाट्याने पुन्हा झेपावले. पुरेशी उंची गाठण्यासाठी कमलनयन बजाज ते नक्षत्रवाडीपर्यंत विमान गेले तेथून पुन्हा वळून परतले. या वेळी पश्चिमेकडून लँडिंग करण्यात आले. विमानात आमदार सतीश चव्हाण, अमरसिंह पंडित, नगरसेवक प्रमोद राठोड होते. त्यांनी इतरप्रवाशांनी नेमके काय झाले याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. राठोड यांनी "दिव्य मराठी'ला सांगितले की, विमानाची चाके जमिनीला टेकण्याच्या बेतात असताना अचानक वेग वाढून विमान पुन्हा झेपावल्याने सगळेच चक्रावले. काय झाले ते कळायला मार्ग नव्हता. चाक वेळीच बाहेर निघाले नाही का, अशी शंकाही चाटून गेली. विमान उतरल्यावर हवाई सुंदरीकडे चौकशी केली असता तिनेही माहीत नसल्याचे सांगितले. विमानतळावर याबाबत चौकशी केल्यावर कळाले की धावपट्टीवर कुत्रे आल्याने विमान उतरवले नाही. विमानतळाच्या परिसरात ससे खूप झाल्याने त्यांची शिकार करण्यासाठी कुत्र्यांचा वावर नेहमी असतो. राठोड म्हणाले की, असे प्रकार नेहमी घडतात असे कर्मचाऱ्यांनी सांगितल्यावर तर अवाकच झालो. विमानांच्या आणि त्यातील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न असल्याने विमानतळ प्राधिकरणाने धावपट्टीवर जनावरे येऊ नयेत यासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार केली पाहिजे, असे ते म्हणाले. गेल्या काही दिवसांत विमानतळावरील अशा घटनांत वाढ झाली आहे. दै. "दिव्य मराठी'ने याबाबत मार्चमध्येच धोक्याची जाणीव करून दिली होती. तरीही आजचा प्रकार घडला आहे.


... तर काय घडले असते?
>लँडिंगच्या वेळी ताशी २०० ते ३०० किमीच्या आसपास वेग असतो. तशात कुठलीही धडक धोक्याची ठरू शकते.
> उतरताना विमानाचा डोलारा तीन चाकांवर तोलला जातो. ही चाके छोटी असतात. एका चाकाला कुत्रे धडकले असते, तर िवमानाचा तोल गेला असता.
> तोल गेलेले विमान एका बाजूला कलून मोठ्या अपघाताचा धोका होता.