आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad Airport News In Marathi, Airport Authority Of India,Take Off, Divya Marathi

उंच इमारती, दिव्यांमुळे औरंगाबाद विमानतळावर विमान उतरवणे झालयं धोकादायक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गेल्या 20 वर्षांत वैमानिक, विमानतळ प्राधिकरणापुरत्याच मर्यादित असलेल्या गंभीर समस्येला तोंड फुटले आहे. उंच इमारती, त्यावरील दिवे, सोडियम व्हेपर लँप आणि मांस विक्रीची दुकाने यामुळे दिवसेंदिवस विमान लँडिंग धोकादायक होत आहे. यातून एखादा भयंकर अपघात होण्याची शक्यता असल्याची इशारेवजा तक्रार वैमानिकांनी प्राधिकरणाकडे केली. त्यांच्या इशार्‍यामुळे महापालिका, पोलिस, सिडको प्रशासनाची यंत्रणा खडबडून जागी झाली. त्यांनी मंगळवारी (आठ एप्रिल) बैठक घेऊन निर्धोक लँडिंगच्या उपायांबाबत खलबते केली.
गेल्या वर्षभरात तीन वेळा विमानाच्या हवाई मार्गात पक्ष्यांमुळे अडथळा आल्याच्या घटना घडल्या. यामुळे चिकलठाणा विमानतळावर लँड होणार्‍या व टेक ऑफ घेणार्‍या विमानांतील हजारो प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पक्ष्यांची संख्या वाढण्यास कारणीभूत असणारी लगतच्या परिसरातील मांस विक्रीची दुकाने बंद करा, झाडांची छाटणी करा, विमानतळाच्या भिंतीला खेटून वाहणारा नाला बंद करा, तसेच भिंतीला खेटून असणार्‍या वसाहतीमुळे वाढलेली कचर्‍याची समस्या दूर करा, अशा सूचना पुढे आल्या आहेत.
विमानतळ प्राधिकरणाचे प्रमुख डी. जी. साळवे, जिल्हाधिकारी विक्रमकुमार, पोलिस आयुक्त राजेंद्र सिंह आणि मनपा व सिडकोच्या अधिकार्‍यांची मंगळवारी बैठक झाली. त्यात या सुरक्षाविषयक गंभीर प्रश्नावर चर्चा झाली. विमानतळासंदर्भातील निर्णय जिल्हाधिकार्‍यांच्या अखत्यारित येत असल्याने त्यांच्या निर्देशानुसार पुढील कार्यवाही होणार आहे. या बैठकीतील चर्चेमुळे मात्र विमान आणि विमान प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
धोका पक्षी, उंच इमारती, दिव्यांचा : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विमानतळावर ये-जा करणार्‍या विमानांना पक्षी, लगतच्या परिसरातील उंच इमारती आणि रस्ते व इमारतींवरील दिवे या तीन बाबी त्रासदायक ठरत आहेत. मागील वर्षभरात विमानांसमोर पक्षी आल्याच्या तीन घटना घडल्या. केवळ वैमानिकांच्या कौशल्यामुळे दुर्दैवी प्रकार घडला नाही. विमानतळालगतच्या मुकुंदवाडी, चिकलठाणा परिसरात उंच इमारतींची संख्या वाढली आहे. त्यामुळेही वैमानिकांना विमानतळावर लँडिंग करताना विमान नियंत्रणात ठेवणे कठीण जात आहे. याशिवाय सायंकाळी आणि रात्री येणार्‍या विमानांना परिसरातील पथदिवे आणि हॉटेल व उंच इमारतींवरील दिव्यांमुळे अडथळे येत आहेत. यासंदर्भात विमान कंपन्यांच्या अनेक वैमानिकांनी तक्रारी केल्या आहेत.
एकदा अपघात झाला आहे : 26 एप्रिल 1993 रोजी इंडियन एअरलाइन्सच्या आयसी 491 या औरंगाबादहून मुंबईला जाणार्‍या विमानाला चिकलठाणा विमानतळावर अपघात झाला होता. टेक ऑफ करताना विमानतळाच्या भिंतीजवळून जाणार्‍या ट्रकशी धडक होऊन झालेल्या या दुर्घटनेत 53 प्रवासी आणि दोन विमान कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला होता. त्यात व्हिडिओकॉन समूहाचे संस्थापक नंदलाल धूत यांचाही समावेश होता. या अपघातानंतर विमानतळाबाहेरचा तो रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला व नंतर विमानतळाचे विस्तारीकरणही झाले.
पुढे वाचा औरंगाबादच्या विमान सेवेविषयी .....