आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad Airport News In Marathi, Divya Marathi, Aurangabad Municipal Corporation

153 उंच इमारती, 20 मोबाइल टॉवरच्या विमानांना वाकुल्या !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - चिकलठाणा, मुकुंदवाडी परिसरात मांसविक्री करणारी 60 दुकाने आहेत, तीही पूर्णत: अवैध. आधीच हा परिसर गुंठेवारीत मोडणारा असल्याने बांधकाम परवानगी काढण्याच्या फंदात कुणी पडत नाही. विमानतळ परिसरात तीन मजल्यांच्या वर इमारती असू नयेत, हा नियम या भागात कागदावरच आहे. 153 उंच इमारती विमानांना वाकुल्या दाखवत उभ्या आहेत. त्यात भर म्हणजे सुमारे 20 अनधिकृत मोबाइल टॉवरचे पेव फुटले आहे. याच प्रश्नांमुळे चिकलठाणा विमानतळावर विमानांचे लँडिंग व टेक ऑफ करताना पायलटचे पाय लटलट करतात.
रामनगरातून जाणार्‍या रस्त्याने दीड किमी अंतर कापले की थेट विमानतळाची पश्चिमेकडील भिंत लागते. भिंतीच्या कडेला खेटूनच बांधकामे झाली आहेत. काही ठिकाणी तर बांधकामांच्या चार भिंतींपैकी एक भिंत विमानतळाची आहे. तेथून थोडे पश्चिमेला गेले की, उजव्या हाताला मुकुंदवाडीचा भाग आहे. दाट लोकवस्ती असलेल्या या भागात नाला आहे. परिसरातील वसाहतीतून वाहत थेट विमानतळाच्या भिंतीला खेटून जाणार्‍या या नाल्यात ड्रेनेज सोडण्यात आले आहे. शिवाय ठिकठिकाणी नाल्यात टाकलेला कचरा वाहत या नाल्यातून येतो. विमानतळालगतच्या या नाल्यातील अन्नावर ताव मारण्यासाठी पक्ष्यांचे थवे बसलेले असतात. विमानतळाच्या भिंतीला खेटून मनपाचा अनधिकृत कचरा डेपोच बनला आहे. मुकुंदवाडी, चिकलठाणा, एसटी कॉलनी, जयभवानीनगर, संघर्षनगर, संतोषीमातानगर भागातील सगळा कचरा येथे डंप केला जातो. त्यावर ताव मारण्यासाठी पुन्हा पक्षी आणि डुकरांची जत्रा भरलेली असते.
भिंतीजवळ मांसाचे ढिगारे
विमानतळाची भिंत पायलटबाबा नगरच्या पुढे संपते. त्यानंतरच्या भागात रस्त्याच्या कडेला मांसांच्या दुकानातील अवशेष, मांसांचे तुकडे पडले दिसतात. या भागातील नागरिकांनी सांगितले की, मांसविक्रीच्या या टापूत मांसविक्रीची किमान 60 दुकाने आहेत. त्यातील बहुतेक अनधिकृत आहेत. या दुकानांतील कचरा रात्री भिंतीजवळ आणून फेकला जातो. शिवाय हॉटेलांतील शिळे, खराब अन्नही आणून टाकले जाते. सोमवारी हे ढिगारे खूप असतात. यामुळे या भागात घारी कायम घिरट्या घालत असतात. नेमक्या याच भागावरून विमान टेक ऑफ करीत असते. परिणामी हाच भाग सर्वाधिक धोकादायक बनतो. मांसविक्रीची दुकाने बंद करण्याचे काम मनपाचे आहे. नगरसेवक तथा स्थायी समितीचे सभापती नारायण कुचे यांनी ही दुकाने बेकायदा असून त्यांच्यावर कारवाई केली तरच हे बंद होईल, अन्यथा भयंकर प्रकार घडतील, असे सांगितले.
सत्तर टक्के इमारतींवर अवैध मजले
विमानतळालगतचा बहुतांश परिसर गुंठेवारीमध्ये मोडतो. बेलगाम बांधकामे करताना विमानतळाजवळ तीन मजल्यांपेक्षा अधिक उंचीच्या इमारती असू नयेत या नियमाच्या पार चिंधड्या करण्यात आल्या आहेत. महानगरपालिकेच्याच आकडेवारीनुसार या भागातील उंच इमारतींची संख्या 153 आहे. त्यापैकी फक्त 30 टक्के इमारतींनीच विमानतळ प्राधिकरणाची परवानगी घेतली आहे. याचा अर्थ 70 टक्के इमारतींवर बेकायदेशीर मजले चढवले गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मोबाइल टॉवरही बेकायदा
इमारतींची उंची 33 फुटांपेक्षा अधिक नसावी, अशी विमानतळ प्राधिकरणाची अट असताना त्यापेक्षाही उंच इमारती उभ्या राहिल्या आहेत. एवढेच नव्हे, तर त्यापैकी काहींवर चक्क मोबाइल टॉवरही उभे राहिले आहेत. बहुतेक टॉवर अनधिकृत आहेत. मनपाने कारवाई न केल्याने हे टॉवर दिमाखात उभे आहेत.
झाडांचा त्रासही मोठा
विमानतळाच्या भिंतीलगतच्या उंच डेरेदार झाडांची छाटणी करून विमानतळ प्राधिकरणाने काही प्रमाणात पक्ष्यांचा त्रास कमी केला; पण लगतच्या नागरी भागात असे किमान 40 वृक्ष आहेत. त्यांची छाटणी करण्याची मागणी आहे.
नाला कधी बुजवणार ?
रामनगर, मुकुंदवाडी परिसरातून वाहत जाणारा नाला या परिसरातील सगळी घाण आपल्यासोबत घेत विमानतळाच्या भिंतीला खेटून पुढे जातो, तेथे त्याला जयभवानीनगरातून येणारा नाला मिळतो. हा नाला बुजवावा, अशी मागणी विमानतळ प्राधिकरणाने केली आहे. प्रत्यक्षात हा नाला बंदिस्त करण्याचे काम भूमिगत गटार योजनेतून होणार आहे. 365 कोटींची ही योजनाच आता भूमिगत झाली आहे.
टेक ऑफ करताना घारींचा अडथळा
विमानतळ प्राधिकरण, मनपा, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस प्रशासन यांची एक संयुक्त बैठक झाली होती. त्यात समस्यांचे गार्‍हाणे मांडण्यात आले होते. ‘दिव्य मराठी’ने गुरुवारी या भागाची प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थिती जाणून घेतली तेव्हा बेलगाम बांधकामे, मनपाचे अक्षम्य दुर्लक्ष यामुळे विमान वाहतूक संकटात आल्याचे स्पष्ट झाले आहे.