आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्तेचा गुलाल रंगू लागला: केंद्र आणि राज्यात आपली सत्ता असतानाही उपयोग काय?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या स्वागतासाठी विमानतळात प्रवेशास भाजप पदाधिकाऱ्यांना रोखल्याने संताप व्यक्त करण्यात आला. केंद्र, राज्यात सरकार असताना अशी वागणूक मिळाल्याचे खापर त्यांनी नेत्यांवर फोडले. फडणवीस आले तेव्हा स्वागतावरून गोंधळ उडाला होता. त्यामुळे आज जास्तीचे पास देण्यास नकार देण्यात आला.

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार अतुल सावे, नारायण कुचे, शहराध्यक्ष बापू घडामोडे यांनाच परवानगी देण्यात आली. महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर यांना पदाचे महत्त्व सांगितल्यावर आत सोडण्यात आले. शिरीष बोराळकर, प्रशांत देसरडा, डॉ. भागवत कराड, बसवराज मंगरुळे, प्रल्हाद पा. शिंदे, मधुकर सावंत, साहेबराव डिघुळे, कचरू घोडके, डॉ. नारायण फंड आदींना प्रवेशद्वारावर रोखले.

विश्वासदर्शक ठरावाबद्दल पत्रकारांनी विचारणा केली असता शहा यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.

ताण कुणावर मारता? : दानवे
स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या वतीने हेमंत खेडकर यांनी आवाज उठवला. दानवेंनी आम्ही प्रयत्न करत आहोत. तुम्ही कशाला ताण मारता, असा टोला मारला. तेव्हा काहीशी शांतता पसरली. मात्र, अखेरपर्यंत पदाधिकारी धुमसतच होते.

अन् फडकेंना प्रवेश
भाजपचे संघटनमंत्री राजेंद्र फडके यांना रोखल्यावर त्यांनी पैसे घेऊन पास द्या, अशी विनंती केली. मात्र, पास बंद केल्याचे सांगण्यात आल्यावर ते भडकले. याची माहिती मिळताच दानवे धावत आले. त्यांनी त्यांना आत नेले.

डिघुळेंचा चहा नेला पण..
दानवेंच्या सूचनेवरून तालुकाध्यक्ष प्रल्हाद शिंदे, साहेबराव डिघुळे यांनी शहांसाठी थर्मासमध्ये घरून चहा आणला होता. चहा देण्याच्या निमित्ताने शहांशी भेट होईल, असे त्यांना वाटले. मात्र, सुरक्षा रक्षक डिघुळेंना प्रवेश नाकारून थर्मास आत घेऊन गेले.