आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मलेशियात अजय चमकला; साबू फेस्टिव्हलमध्ये औरंगाबादच्या अजय शेंडगेचे नृत्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मलेशियातील साबू शहरात सर्वात मोठा फेस्टिव्हल होतो. या वर्षी या फेस्टिव्हलमध्ये दहा देशांच्या प्रतिनिधींनी आपली कला सादर केली. यात भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी शहरातील अजय शेंडगे या हरहुन्नरी कलाकाराला मिळाली. कथ्थक नृत्य प्रकारात त्याने केलेले सादरीकरण हजारो प्रेक्षकांना स्तिमित करून गेले. अजयच्या सादरीकरणाला मलेशियाच्या सांस्कृतिक आणि पर्यटनमंत्र्यांनी उभे राहून दाद दिली. या वेळी मिळालेल्या टाळ्यांच्या कडकडाटाने औरंगाबादेत रामनगर येथे राहणार्‍या या कलावंताचा ऊर भरून आला. माझी 18 वर्षांची कलेची तपश्चर्या फळाला आली असल्याचे मत अजयने व्यक्त केले.
आपण आपल्या देशाचे नाव उंचावले या भावनेने मान ताठ होते आणि डोळ्यांच्या कडा आपसूकच ओल्या होतात. अनुभव सांगताना आजही अजयच्या अंगावर शहारे उभी राहतात. तीन ते सात जूनदरम्यान मलेशियात झालेल्या ‘साबू फेस्टिव्हल’मध्ये अजयने भारताचे प्रतिनिधित्व केले. कथ्थक आणि ओडिसी हे कलाप्रकार त्याने या महोत्सवात सादर केले. त्याच्या या सादरीकरणाची दखल मलेशियातील वृत्तपत्रांनीदेखील घेतली. त्याच्यातील कलेची नोंद घेत सर्वच वृत्तपत्रांनी त्याचे कौतुक केले. फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी विविध देशांतून आलेल्या कलाकारांसाठी त्याने कार्यशाळा घेतली.

शहरातील विवेकानंद महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवीपर्यंत शिक्षण घेतलेला अजय 18 वर्षांपासून या कलेची अखंड साधना करत आहे. रामनगर येथील तुळजाभवनी शाळेतून त्याने शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. कलेचा कुठलाही वारसा नसताना अजयने निवडलेल्या या वाटेवर त्याने केलेल्या परिश्रमामुळेच त्याला यशाच्या शिखरापर्यंत घेऊन जात आहे.

लहानपणी या कलाप्रकाराकडे आकर्षित होऊन त्याने नृत्याचे प्राथमिक धडे मीरा पाऊस्कर यांच्याकडे घेतले. त्यानंतर पुण्यात रोशन दाते आणि कोलकात्यातील मोनालिसा घोष यांच्या मार्गदर्शनाखाली अजयने प्रावीण्य मिळवले. आता त्याने स्वत: नृत्ययात्रा कला अकदमीची स्थापना केली असून शहरातील विद्यार्थ्यांना ओडिसी आणि कथ्थक नृत्यप्रकाराचे प्रशिक्षण तो देत आहे.
वेरूळ महोत्सव व्हावा
साबू हे मलेशियातील मोठे शहर आहे. देश-विदेशातील कलाकार या महोत्सवात आपली कला सादर करतात. शहरातील प्रेक्षकांना विविध कलाप्रकार पाहता यावेत म्हणून या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. त्याचबरोबर स्थानिक कलावंतांनादेखील या महोत्सवात व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. शिस्त आणि नियोजनामुळे खूप कमी काळात या महोत्सवाने जागतिक दर्जाचे स्थान मिळवले आहे. वेरूळ महोत्सवालाही अशा प्रकारची उंची यावी यासाठी काम करण्याची इच्छा असल्याचे अजय सांगतो. वेरूळ महोत्सव अधिक समृद्ध होऊ शकतो, असेही तो म्हणाला.