आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संवेदनशील कटकट गेटवर एमआयएम-सेना नेते एकत्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - १९८०च्या दशकात दंगलीचे केंद्र आणि अगदी दोन-तीन वर्षांपूर्वी संवेदनशील भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कटकट गेटला बुधवारी अनोखा सोहळा झाला. विकासकामाच्या निमित्ताने एमआयएम आणि शिवसेनेचे पदाधिकारी एकत्र आले होते. पालकमंत्री रामदास कदम यांच्यासाठी फटाक्यांची आतषबाजीही झाली. कोणत्याही पक्षाचा राजकारणी चांगले काम करणार असेल तर जात-पात-धर्म विसरून स्वागत केले जाते, असा संदेश यातून देण्यात आला.
राजकारणात कट्टर विरोधक असलेल्या एमआयएम, शिवसेनेचे नेते कधी एका मंचावर येतील, असा विचारही दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी कधी केला नसावा; परंतु आमदार इम्तियाज जलील यांनी कटकट गेट रस्ता, पुलाच्या कामाचे भूमिपूजन करण्यासाठी कदम, महापौर त्र्यंबक तुपे यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांना निमंत्रित केेले. त्यांनीही ते स्वीकारल्याने हा सोहळा झाला.

उन्हातप्रेमाचे फवारे : सोहळ्यासाठीशामियाना नसल्याने सर्वांना उन्हात बसावे लागले. कार्यक्रम लांबल्याने घामाच्या धारा वाहू लागल्या. त्याचा उल्लेख आमदार संजय शिरसाट यांनी केला. सेनेच्या मंत्र्याला मी कार्यक्रमासाठी आणले, पण उन्हात बसवले, असे इम्तियाज सर्वांना सांगतील, असा टोला त्यांनी लगावला, तर इम्तियाज यांनी मला मुद्दाम उन्हात ठेवले असले तरी प्रेमाची सावली दिली, असे कदम म्हणाले.

खरा चेहरा दिसला : शिवसेनाएमआयएमची मिलीभगत पूर्वीपासूनच आहे. शिवसेनेमुळे एमआयएमचे आगमन झाले. एमआयएम आल्याने सेनेला बळ मिळाले. दोन्ही पक्ष एकमेकांच्या जिवावर सर्वांची दिशाभूल करताहेत. कटकट गेटला दोघांचाही खरा चेहरा लोकांना दिसला असे काँगेसचे शहराध्यक्ष नामदेव पवार म्हणाले.

आता युती करावी : विकास,शांततेसाठी या दोन्ही पक्षांनी युती करून निवडणुका लढवाव्यात. आयुक्त प्रकाश महाजन यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव, स्थायी समिती सभापती निवडणुकीत त्यांनी युतीची जाहीर प्रचिती दिली होती. त्याचे हे दुसरे उदाहरण. यापेक्षा दुसरे काय, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष काशीनाथ कोकाटे म्हणाले. सकारात्मकदृष्टिकोनातून पाहा :
विकासकामांतजाती-धर्म असू नये, असे भाजपचे धोरण आहेत. कटकट गेटच्या सोहळ्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघितले गेले पाहिजे. यापूर्वीही मुस्लिमबहुल वाॅर्डात युतीने निधी दिल्याचे भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी म्हणाले.

कटकट गेट येथे शिवसेना, एमआयएम नेत्यांचे एकत्र पोस्टर लावण्यात आले आहे.
औरंगाबादेत हिंदू-मुस्लिम वाद नाहीत. माझ्याकडे अनेक मुस्लिम कार्यकर्ते येतात. दिल्लीत माझ्याकडेच मुक्कामी राहतात, मी त्यांची सर्व कामे करतो. पुढच्या निवडणुकीत आम्ही एमआयएमची मते फोडू.
- चंद्रकांत खैरे

इम्तियाज हे चांगले आमदार आहेत. निवडणूक संपल्यानंतर जनतेचे सेवक म्हणून काम केले पाहिजे. सर्व नेत्यांनी विकासाची कामे केली तर दंगली होणार नाहीत. ‘हम सब एक हैं’ हे आपण विकासकामांतून दाखवून देऊ.
-रामदास कदम

पालकमंत्र्यांनी निधी देऊन निवडणुकीनंतर पक्ष नसतो हेच दाखवून दिले. एमआयएमचे नेते शिव्या देण्यात तरबेज आहेत. शिवसेनेचे नेते विकासकामांचे आश्वासन पूर्ण करणारे आहेत.
- संजय शिरसाट

पालकमंत्री कदम यांनी माझी मागणी मान्य केली. त्यामुळेच या कार्यक्रमाला मी त्यांना आवर्जून बोलावले. राजकारणाच्या वेळी राजकारण अन् विकासाच्या वेळी विकास झाला पाहिजे. शिवसेना हिंदुत्ववादी आहे अन् एमआयएम कोणत्या विचाराचा आहे हा विषय फक्त निवडणुकीतच दिसेल. -इम्तियाज जलील

एमआयएमचे सर्वेसर्वा ओवेसी बंधू, पक्षाचे शहराध्यक्ष, आजी-माजी विरोधी पक्षनेते, वाॅर्डाचे नगरसेवक अन् पालकमंत्री कदम, खासदार चंद्रकांत खैरे, माजी आमदार प्रदीप जैस्वाल, महापौर त्र्यंबक तुपे असे एमआयएम, सेना नेत्यांचे छायाचित्र असलेले भव्य पोस्टर कटकट गेटला झळकत होते. यापूर्वी सेना नेते किंवा पदाधिकाऱ्यांचे पोस्टर कुणीही पाहिले नाही.
बातम्या आणखी आहेत...