आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Aurangabad AMC Chairman Kuche Betten Engineer Mote

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नळाला गढूळ पाणी येते म्हणून मनपा अभियंत्याला सभापतींची बुटाने मारहाण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - नळाला गढूळ पाणी येत असल्याच्या तक्रारीनंतर पाहणीसाठी गेलेले पालिकेचे कनिष्ठ अभियंता सुभाष मोटे यांना स्थायी समितीचे सभापती नारायण कुचे यांनी 50 जणांच्या जमावासमोर उपअभियंता आय. बी. ख्वाजा यांच्या समक्ष बुटाने मारहाण केली. यात मोटे यांचा चष्मा फुटून डोळ्याला गंभीर दुखापत झाली. मुकुंदवाडी भागातील संघर्षनगरात दुपारी बारा वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला.

कुचे यांनी मोटेंना मारहाण केल्याचे ख्वाजा यांनी सांगितले. त्यानंतर कार्यकारी अभियंता सखाराम पानझडे यांनीही या भागाला भेट दिली. अधिकार्‍याला मारहाण झाल्याचे स्पष्ट करतानाच लेखी अहवालाची प्रतीक्षा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जमावाकडून मोटे यांना मारहाण होत असल्याचे समजल्यानंतर मी तेथे गेलो आणि त्यांची सुटका केली, असे सांगत कुचे यांनी राजकीय पद्धतीने कानावर हात ठेवले. या प्रकारामुळे पालिका वर्तुळात खळबळ उडाली असून कुचे यांच्या आदेशानंतरही मोटे यांनी त्यांची भेट घेतली नव्हती. तेच या मारहाणीमागचे कारण असल्याचे सांगण्यात येते. मोटे यांच्यावर दत्तकृपा नेत्रालयात उपचार करण्यात आले. यापूर्वीही कुचे यांनी एका पोलिस कर्मचार्‍याला मारहाण केली होती. त्याची मुकुंदवाडी पोलिसांत नोंद आहे.


दालनात भेटा नाही तर बघून घेतो

दरम्यान, पालिका अधिकार्‍यांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मला दालनात येऊन भेटा, असे आदेश कुचे यांनी अधिकार्‍यांना दिले आहेत. माझे फक्त आठ महिने राहिले आहेत, तातडीने भेटा, जे भेटणार नाहीत, त्यांना बघून घेतले जाईल, अशी धमकी त्यांनी दिली आहे. दालनात न भेटणार्‍यांपैकी मोटे हे असून त्यामुळेच गढूळ पाण्याचे निमित्त करून त्यांना आपल्या वॉर्डात कुचे यांनी मारहाण केल्याची चर्चा आहे. मारहाणीचा प्रकार चुकीचा असल्याचे पालिका अधिकारी महासंघाचे अध्यक्ष सखाराम पानझडे यांनी म्हटले असून हेतुपुरस्सर मारहाण होत असेल तर आंदोलनाचा विचार करावा लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

माझ्या अधिकार्‍यावर हल्ला झाल्याचे समजल्यानंतर मी प्रत्यक्ष पाहणी केली. गढूळ पाणी येण्याची कारणे वेगळी आहेत. परंतु मोटे यांना जबर मारहाण झाली असून हा प्रकार गंभीर आहे. त्यांच्याकडून आयुक्तांना लेखी अहवाल देण्यात येणार असून त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.
सखाराम पानझडे, कायर्कारी अभियंता, पाणीपुरवठा.

योग्यच झाले
लोकांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याची माहिती देऊनही अधिकारी कारवाई करत नाहीत. त्यांना धडा शिवण्यासाठी जे झाले ते योग्यच झाले. यापुढे पाणी पुरवठा व्यवस्थित झाला न झाल्यास काळे फ ासण्यात येईल.
जयकिशन कांबळे, नागरिक, संघर्षनगर.

मारहाण करून प्रश्न सुटत नाही
पाणी पुरवठा वेळेवर होत नाही म्हणून एखाद्या अधिकार्‍यांना मारहाण करणे संयुक्तिक नाही. पाणी पुरवठय़ाच्या समस्येकडे आयुक्तांनी लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा पाणी प्रश्न आणखी पेटेल.
सुनील जगताप, नागरिक, मुकुंदवाडी.

..तर जखम धोकादायक
डोळ्याच्या आतील भागात साधारण जखम झाली आणि त्याठिकाणी रक्त साचले की डोळा लाल होतो. काळ्या बुबुळाच्या वर जर जखम झाली तर ती धोकादायक ठरू शकते.
डॉ. वंदना काबरा, नेत्रतज्ज्ञ

घटनेनंतर मुकुंदवाडीतील राष्ट्रवादी कार्यालयात बैठक घेण्यात आली. या वेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष बापू घडामोडे, कुचे, राष्ट्रवादीचे सुनील जगताप, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, अभियंते उपस्थित होते. बैठकीत मोटे यांची बदली करावी, कुचे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करू नये, असे ठरले. मनपा अधिकारी संघटना सोमवारी कामबंद आंदोलन करू शकते.