आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शास्त्रीय, उपशास्त्रीय आणि फ्यूजन नृत्यांचा नजराणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- नृत्याच्या माध्यमातून विचार आणि भावना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचे कौशल्य कलावंतांची साधना सांगणारे आहे. शास्त्रीय, उपशास्त्रीय आणि फ्यूजन नृत्य तसेच गायनात लक्षवेधी कामगिरी करत ६५०० कलावंतांमध्ये ध्यास परफॉर्मिंग आर्ट्सच्या साधकांनी संघ नृत्यात प्रथम पारितोषिक पटकावत बाजी मारली. अखिल भारतीय सांस्कृतिक संघाच्या स्पर्धेत पहिल्यांदाच उतरत औरंगाबादच्या कलावंतांनी यश संपादन केले.
संघाच्या वतीने गेल्या १० वर्षांपासून ही स्पर्धा घेण्यात येते. पुणे येथे नुकत्याच झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्र, कर्नाटक, दिल्ली, तामिळनाडू अशा विविध राज्यांतून कलावंत सहभागी झाले. शास्त्रीय नृत्यप्रकारात सांघिक सादरीकरण करताना "यन्नाळू अंबलत्तील' ही रचना नृत्यांगनांनी विलक्षण चपळाईने रसिकांपुढे ठेवली. देवळात नटराज पूजनासाठी गेलेल्या मुलींना मूर्ती पाहून येणारे विचारांचे वर्णन यामध्ये करण्यात आले होते. लय-ताल आणि पदन्यासाचा संगम यामध्ये त्यांनी दाखवला. सुरुक्ती राग आणि आदितालात ही रचना निबद्ध होती. याला जोडूनच पाणी अर्वतनम् ही अलौलिक नृत्यप्रस्तृतीही झाली.
मृदंगाचे बोल असलेल्या या रचनेत विलंबित, मध्य आणि द्रुत अशा तिन्ही लयीमध्ये जती हा शुद्ध नर्तन प्रकार उपस्थितांची दाद मिळवणारा ठरला. तर परिक्षकांनीही याला प्रथम पसंती दिली. यामध्ये स्वराली मुळे , प्राजक्ता राजूरकर, अंकिता मुळे, श्रेयसी वडगावकर, ऋचा देशमुख, आसावरी मोरे, वैष्णवी कुलकर्णी, मृणाल पतंगे यांचा समावेश होता. यानंतर द्वंदनृत्य प्रकारात अंकिता मुळे आणि मृणाल पतंगे यांनी दशावतारातून मनोहारी नृत्य दाखवले. आदिताल आणि रागमालिका असलेल्या या नृत्याला मध्यवाती स्वरात बांधण्यात आले होते. दक्षिणेतील रचनाकार दक्षितार यांनी या नृत्याची रचना केली आहे. याला जोडून करण्यात आलेल्या तिलान्नाला राग हिंदोळम आणि आदितालात रचण्यात आले होते. या नृत्याने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. स्वराली मुळे आणि प्राजक्ता राजूरकर भरतनाट्यमवर आधारलेले फ्यूजन नृत्य लक्षवेधी केले. शिवतांडव स्तोत्राची ही रचना फ्यूजन नृत्याचे सौंदर्य जपणारी होती.
सुगम आणि नाट्यसंगीत स्पर्धेत मारली बाजी
अमिताभ यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आजही रुंजी घालणाऱ्या "छू कर मेरे मन को किया तूने क्या इशारा' या गाण्याने रोहित देशपांडे याने बाजी मारली, तर तारिणी नववसनधारिणी या नाट्यपदातून सुरभी कुलकर्णी हिने लक्ष वेधले. मिश्र तिलंग रागातील ही रचना तीन तालांत बांधण्यात आली होती. तिला सुरभीने सशक्तपणे निभावले. स्वरांची हुकूमत दोघांनीही आपल्या गायनातून सिद्ध केली.
स्पर्धांतून साधनेला आयाम
- सर्वच कलासाधक रियाज आणि साधनेतून आपल्या कलेत पारंगत होतात. स्पर्धांमुळे त्याला नवा आयाम मिळतो. या स्पर्धेमुळे सर्वांचा आत्मविश्वास वाढला तेच खरे पारितोषिक आहे.
केतकी नेवपूरकर, भरतनाट्यम गुरू
- या स्पर्धेत ध्यासने पहिल्यांदाच प्रवेश केला. पहिल्या प्रयत्नात मिळालेले यश सर्वच कलावंतांसाठी आणि गुरू म्हणून माझ्यासाठी अनमोल आहे.
सचिन नेवपूरकर, संचालक ध्यास फाउंडेशन
बातम्या आणखी आहेत...