आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एटीएम चोरीचे ‘कोडे’ उलगडेना.!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - डिकोडिंगद्वारे एटीएममधून 16 लाख 17 हजार 100 रुपये चोरण्याच्या आरोपाखाली अटकेत असणारे कस्टोडियन प्रकाश प्रधान आणि सुदाम ढाकरस या दोघांनीही अद्याप गुन्हा कबूल केलेला नाही. त्यामुळे तपास आव्हानात्मक बनला आहे. सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी शनिवारी (16 नोव्हेंबर) आणखी काहींची झाडाझडती घेतली, मात्र तपासाला गती मिळाली नाही.
कॅश अपलोड करणारी कंपनी आयएसएसएसडीबीसाठी कस्टोडियन म्हणून प्रकाश आणि सुदाम मागील दीड ते दोन वर्षांपासून काम करत होते. त्यांच्याकडे 25 ते 30 एटीएमचे काम सोपवण्यात आले होते. त्यामुळे विविध एटीएमचे वेगवेगळे कोड क्रमांक लक्षात राहत नसल्यामुळे डायरीवर लिहून ठेवण्याची त्यांची सवय होती. कंपनीकडे कार्यरत सर्वच अधिकारी आणि कर्मचार्‍यांकडून काहीतरी ‘क्लू’ मिळवण्यासाठी क्षीरसागर यांनी आतापर्यंत सर्व कर्मचार्‍यांची तपासणी केली आहे. दोघांचीही 18 नोव्हेंबरला पोलिस कोठडी संपत असून त्यांनी तोंड उघडलेले नाही. त्यामुळे चोरीत आणखी कुणाचा हात होता का.? याची शक्यताही तापसण्यात येत आहे. दरम्यान, गुन्हा उघडकीस येईपर्यंत आपण मुकुंदवाडी पोलिसांना सर्वतोपरी मदत करणार असल्याचे आयएसएसएसडीबीचे अधिकारी प्रवीण सोमवंशी यांनी स्पष्ट केले आहे. परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक जयकुमार चक्रे आणि क्षीरसागर हे संयुक्तपणे तपास करत आहेत.