आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिढा सुटला - पूर्व-पश्चिम उड्डाणपुलाची मागणी करणारी याचिका डीएमआयसीमुळे फेटाळली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - भविष्यात डीएमआयसी प्रकल्पाच्या विस्तारामुळे रेल्वेस्टेशन ते मध्यवर्ती बसस्थानक रस्त्यावर वाहनांची सर्वाधिक वर्दळ राहणार असल्याचे राज्य रस्ते विकास महामंडळाचे म्हणणे ग्राह्य धरून औरंगाबाद हायकोर्टाने महावीर चौक (बाबा पंप) येथील दक्षिणोत्तर उड्डाणपुलास मान्यता दिली.
हा उड्डाणपूल पूर्व -पश्चिम (जालना ते नगर रोड) करण्यात यावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका हायकोर्टाचे न्यायमूर्ती ए. व्ही. निरगुडे व न्यायमूर्ती ए. आय. एस. चिमा यांनी फेटाळली आहे. या निर्णयामुळे महावीर चौक उड्डाणपुलाचा मार्ग निकाली निघाला असून आता उड्डाणपूल रेल्वेस्टेशन ते मध्यवर्ती बसस्थानक याच रस्त्यावर होईल.

शहरात एकात्मिक रस्ते विकास योजनेंतर्गत उड्डाणपूल उभारण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. जालना रस्त्यावर सेव्हन हिल्स व क्रांती चौक येथे उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले असून मोंढा नाका, सिडको बसस्थानक चौक व महावीर चौकातील काम प्रस्तावित आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने महावीर चौक उड्डाणपूल पूर्व-पश्चिम उभारण्याचा निर्णय घेतला होता. परंतु काही कारणास्तव या पुलाची उभारणी दक्षिणोत्तर करण्यास हिरवा झेंडा दाखवण्यात आला.

पुलाखाली पर्याप्त जागा
नवीन उड्डाणपूल बांधताना इंडियन रोड काँग्रेसच्या नियमांचे पालन करण्यात आले असून महावीर चौक उड्डाणपुलाची उंची १५.५ मीटर ठेवण्यात आली आहे. पुलाच्या खालील दोन्ही रस्त्यांची लांबी पन्नास फूट ठेवली आहे. रेल्वेस्थानक ते बसस्टँडदरम्यानच्या वाहतुकीची कोंडी होणार नाही. पंचवटी चौक व महावीर चौक असे दोन जंक्शन मिळणार असल्याने वाहतुकीवर ताण येणार नसल्याचे पूल दक्षिणोत्तर करण्याचा निर्णय घेतल्याचे शपथपत्रात स्पष्ट केले. सत्यसाईबाबा कन्स्ट्रक्शनच्या वतीने अॅड. प्रदीप देशमुख यांनी शपथपत्र दाखल केले. याचिकेत केंद्रातर्फे अॅड. संजय देशपांडे, तर याचिकाकर्त्यातर्फे अॅड. सतीश तळेकर यांनी बाजू मांडली.

हायकोर्टात आव्हान
औरंगाबाद बस ओनर्स आणि ट्रॅव्हल ओनर्स असोसिएशन आणि इतर चौदा याचिकाकर्त्यांनी हायकोर्टात जनहित याचिकेद्वारे आव्हान दिले. उड्डाणपूल दक्षिणोत्तर करणे जनहितविरोधी असल्याचे याचिकेत नमूद केले होते.

जालना रोडवरील ताण कमी
राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने अॅड. एस. व्ही. अदवंत यांनी हायकोर्टात शपथपत्र दाखल केले. शहराच्या दक्षिणेकडे होणाऱ्या डीएमआयसीमुळे या बाजूने वाहतुकीत मोठी वाढ होत आहे. उत्तरेकडील जळगाव रस्त्यावरही वाहतुकीत मोठी वाढ होत आहे. नगर रस्त्याकडील संरक्षण विभागाच्या वसाहतीमुळे फारसा विकास नाही. पैठण लिंक रोडमुळे नाशिक व नगर रोडवरून येणाऱ्या वाहतुकीचे विभाजन झाले आहे. जालना रस्त्याकडून येणारी वाहतूक झाल्टा फाटा येथून वळवल्यामुळे शहरातील जालना रस्त्यावरील ताण कमी झाला आहे. रेल्वेस्टेशन ते मध्यवर्ती बसस्थानक रस्त्यावर वाहनांची सर्वाधिक वर्दळ राहणार असल्याने महावीर चौक येथील दक्षिणोत्तर उड्डाणपुलास मान्यता मिळाली.
याचिकेतील महत्त्वाचे मुद्दे
>केवळ संरक्षण विभागाकडून जमीन मिळणार नाही या हेतूने उड्डाणपूल पूर्व-पश्चिम करणे टाळले.
>संरक्षण विभागाकडे जागेसाठी रीतसर मागणी केली नाही.
>सहायक पोलिस आयुक्त (वाहतूक) यांनी पूल दक्षिणोत्तर करणे वाहतुकीच्या दृष्टीने अयोग्य असल्याचा अभिप्राय दिलेला आहे.
>शहरात महावीर चौकात दक्षिणोत्तर होणाऱ्या वाहतुकीच्या तुलनेत पूर्व-पश्चिम वाहतूक पाचपट आहे.
>रस्ते विकास महामंडळाने पूल पूर्व-पश्चिम करण्याचा पहिला प्रस्ताव दिला, तर दक्षिणोत्तर करणारा प्रस्ताव दुसरा होता.