आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रायगडावर घुमला औरंगाबादच्या मोरया पथकाचा आवाज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहानूरमियाँ दर्गा भागातील म्हाडा कॉलनीत राहणाऱ्या मोरया ढोल पथकांनी रायगडावर आपली कला सादर करून लाखो शिवभक्त, मंत्री आणि अधिकाऱ्यांची मने जिंकली. आपण काय आहाेत याचा विसर पाडून आपल्या तालावर ताल धरायला लावणाऱ्या या ढोल पथकाने औरंगाबादची मान राज्यात उंचावली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनीदेखील कलाकारांचे तोंडभरून कौतुक केले. निमित्त होते २१ जानेवारी रोजी रायगडावर आयोजित करण्यात आलेल्या रायगड महोत्सवाचे. यात मोरया गणेश मंडळ आणि पावन गणेश मंडळांना कला सादर करण्याची संधी मिळाली होती. महिन्याभरापूर्वी राज्यातील विविध जिल्ह्यांत सांस्कृतिक विभागाकडून ढोल पथकाच्या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धा औरंगाबाद येथील जिल्हा परिषदेच्या मैदानात घेण्यात आल्या.

त्यात क्रमांक मिळवणाऱ्या दोन पथकांना रायगड येथे होणाऱ्या महोत्सवात कला सादर करण्याची संधी मिळाली. मोरया पथकातील ३९ तरुण आणि ११ तरुणींनी यात सहभाग नोंदवला होता. या महोत्सवासाठी पनवेल, मुंबई, यवतमाळ, पुणे, रायगड अशा १४ ढोल पथकांचा सहभाग होता.

कॉलनीत ढोल बडवून का लोकांना त्रास देता, असे काही लोक या तरुणांना नेहमी रागवत, काही लोक तर त्यांच्या अंगावर धावून गेलेे. मात्र या तरुणांनी जिद्द सोडली नाही. त्यांना यश मिळताच रागवणाऱ्यांनी या तरुणांचे कौतुक केले. याच वर्षी गणेशाेत्सवाच्या वेळी या मंडळाची स्थापना झाली आहे.

अभिमान वाटला
ढोलपथक हे महाराष्ट्राचे वेगळेपण आहे. महराष्ट्रात होणाऱ्या महाराजांच्या रायगड महोत्सवात आम्हाला ढोल पथक म्हणून औरंगाबादचे प्रतिनिधित्व करता आले याचा आम्हाला अभिमान आहे. थोडी जरी चूक झाली तर औरंगाबादचे नाव खराब होईल, अशी भिती होती. - योगेश आमराव, मोरयाढोल पथक

जय मल्हारचे वेड
मोरया गणेश मंडळाच्या जय मल्हार या अनोख्या चालीची महोत्सवात चर्चा होती. या चालीवर अनेकांना ठेका धरला होता.या पथकाने रामलखन, कोल्हापुरी, गझल, गरबा, लगान या चालींचे सादरीकरण केले. यासाठी जितेंद्र वाघमारे यांनी प्रशिक्षण दिले. तर योगेश आमराव, मनोज बरेतिये, सुनीला क्षत्रिय, दशरथ पाईकराव, सचिन बुरांडे, आकाश बिडलान, अक्षय लिबोर, अभिजित कबाडे, सिद्धार्थ खंडागळे यांनी परिश्रम घेतल तर सौरभ खंडागळे या शालेय मुलाच्या तालावर पथक उभे आहे हे येथे उल्लेखनीय.