आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad Beed Bye Pass NA 44 Issue Public Harassment

झालर प्रारूप आराखड्यातील रस्त्यामुळे 90 कुटुंबे भयभीत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- सातारा परिसरातील उमरीकर लॉनपासून बीड बायपास रस्त्याला तिरकसपणे जोडणार्‍या झालर आराखड्यातील रस्त्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. या नवीन रस्त्यामुळे अनेक नोंदणीकृत एनए 44 मालमत्ता बाधित होत आहेत. आमदार रोड व रेणुकामाता मंदिर कमानीकडून जाणार्‍या दोन रस्त्यांच्या मधोमध टाकलेला तिरकस 30 मीटर रस्ता रद्द करण्याची एकमुखी मागणी 90 मालमत्ताधारकांनी झालरक्षेत्र नियोजन समितीकडे केली आहे.
सातारा परिसरात ग्रामपंचायतीकडून रीतसर परवानगी घेऊन नागरिकांनी घरे बांधलेली आहेत. शासनाच्या विविध यंत्रणांमार्फत मंजूर लेआऊटमधील प्लॉटधारक गट क्रमांक 169, 159, 105, 104, 103, 99, 97, 96, 95, 92 व 91 मध्ये राहतात. घरांसाठी राष्ट्रीयीकृत बँक, शासकीय वित्तीय संस्थांमार्फत कर्ज घेण्यात आले आहे. परिसरातील नागरिकांनी सिडको झालरक्षेत्र झोन क्रमांक 5 मध्ये साठ मीटरचा नवीन रस्ता बीड बायपास रोडला जोडणारा दाखवला आहे. गट क्रमांक 169 मधून सरळ चाटे स्कूलमार्गे गट क्रमांक 107 कडे अस्तित्वातील वहिवाटीचा व वर्दळीचा 9 मीटरच्या सरळ रस्त्याचे अनुकरण करण्याऐवजी अचानक तिरकसपणे नागरिकांच्या वसाहतीतून डावीकडे वळवण्याचे कारण समजत नसल्याचे म्हटले आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या मालमत्तांवर नवीन रस्त्याच्या अलाइनमेंटमुळे टाच आली आहे.
परिसरातील मालमत्तांना बांधकाम परवानगी, कर आकारणी, बांधकाम पूर्णत्वाचे दाखले ग्रामपंचायतीने दिलेले आहेत. कुठल्याही अभिकरणाने नियोजन करताना कमीत कमी मालमत्तेचे नुकसान होईल अशा स्वरूपाचे नियोजन केले जावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
महत्त्वाचे मुद्दे
>कृषी विद्यापीठ बदनापूर येथील निवृत्त प्राध्यापक सखाराम शिंदे यांनी प्लॉटवर घराचे सुंदर बांधकाम केले. केवळ प्लास्टर करणे शिल्लक असताना प्रारूप आराखड्यात आपल्या घरावरून रस्ता जात असल्याचे लक्षात येताच त्यांनी घराचे काम थांबवले.
>अभ्युदय बँकेचे कर्ज घेऊन तीस वर्षांपूर्वीचा प्लॉट विकसित केल्यावर त्यावरच रस्त्याचे आरक्षण टाकण्यात आले.
वैध मालमत्तांचे काय : परिसरातील साई एन्क्लेव्ह इमारतीच्या जागेचा 1986 मध्येच एनए 44 झालेला आहे. सिडको प्राधिकरण म्हणून उशिरा आलेली असताना झालर प्रारूप आराखड्यात मात्र वैध मालमत्तांवर नांगर फिरवला जात असल्याचे विजय पबतवार व दिगंबर चौरे यांनी सांगितले.
एनए 47 (ब) प्रलंबित
>जिल्हाधिकार्‍यांनी एनए 45 चे रूपांतर एनए 47 (ब) मध्ये करण्याची मोहीम चालवली. त्यासाठी सातारावासीयांकडून मालमत्ता मोजणीसाठी फी भरून घेतले.
-सुभाषराव जाधव, नागरिक, सातारा
घर बांधण्यासाठी बँकेचे कर्ज काढले
>सातारा परिसरात प्लॉट घेऊन घर बांधण्यासाठी बँकेचे कर्ज काढले. एनए 44 प्लॉट असून अजून मुलीचे लग्न बाकी असताना घरावर नांगर फिरवण्याची शासन तयारी करीत असल्याने अन्न गोड लागत नाही.
-चंदा कासवा, नागरिक.
>शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालयात प्राध्यापक असताना एचडीएफसी बँकेचे कर्ज घेतले. परिसरात तीन प्लॉट असून नेमक्या घर बांधलेल्या प्लॉटवरच रस्ता प्रस्तावित केल्याने मोठी गैरसोय होत आहे.
-प्रा. भागवत जमादार
>सातारा परिसरात सर्वसामान्यांच्या मालमत्तांवर प्रारूप आराखड्यामधील प्रस्तावित रस्त्यामुळे अडचण निर्माण झाली आहे. जीवनाची पुंजी लावून नागरिकांनी घर बांधले व आता त्यावरूनच रस्ता टाकला जात आहे. उपरोक्त रस्ता रद्द करण्यात यावा.
- डॉ. सचिन लोहिया, रहिवासी