आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वत: पडला, पण तीन तास खड्ड्यात उभे राहून इतरांना केले सतर्क

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आैरंगाबाद - पहाटे साडेपाचची वेळ... नोकरीच्या ठिकाणी जाण्याची घाई असल्याने समाधान साळुंके या युवकाने बीड बायपासवर दुचाकीचा वेग वाढवला. तितक्यात पाणी साचलेल्या खड्ड्याचा अंदाज न आल्याने समाधानची दुचाकी खड्ड्यात आदळली आणि तो बाजूला फेकला गेला. कसेबसे त्याने स्वत:ला सावरले आणि इतर वाहनांचा अपघात घडू नये म्हणून पहाटे सहा ते सकाळी ९ वाजेपर्यंत सर्व वाहतूक खड्ड्याच्या बाजूने वळवली. स्वत:वरील प्रसंग इतरांवर ओढवू नये म्हणून समाधानने ड्यूटी सोडून वाहनधारकांना वाचवले, पण मुख्य जबाबदारी असणाऱ्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या उपअभियंत्यांनी मात्र खड्डा बुजवण्याची ड्यूटी केली नाही.
बीड बायपासवरील के. के. मार्केट, शाहमीरखान मार्केट ते हिवाळे पाटील लॉन्ससमोरील मुख्य रस्त्याच्या मध्यभागी तीन फूट रुंंद आणि एक फूट खोल खड्डा पडला आहे. गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत असल्याने या रस्त्यावर तळे साचले आहे. रेल्वेस्टेशन एमआयडीसी परिसरातील ग्राइंड मास्टर या कंपनीत काम करणारा समाधान पहाटे त्यात पडला व जखमी झाला. स्वत:ला सावरून तो ड्युटीवर जाऊ शकला असता, पण दुसरा कोणी या खड्ड्यात पडला तर प्रसंगी जिवावर बेतू शकते, याची पुरेपूर जाण असल्याने त्याने ड्युटीवर न जाता साडेतीन तास वाहतुकीला वळण देण्याचे कार्य केले. त्याचे हे कार्य पाहून रस्त्यावरून जाणाऱ्या अभय जोशी या तरुणाने समाधानला सहकार्य केले. खड्ड्यात पडल्यामुळे समाधानचा मोबाइल बिघडला. जवळपास तीन तास त्याने मोबाइल शोधण्याऐवजी वाहनधारकांना खड्ड्यापासून वाचवले.
अनेक जण पडले

बीड बायपासवर पावसाच्या पाण्यामुळे नेहमी तळे साचते. तीन िदवसांपासूनच्या पावसामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून रात्री अंधारात रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने बुधवारी अनेक वाहनधारक घसरून पडले. या रस्त्यावरील तीन िठकाणी खड्डे पडलेले असल्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. ५० हजारांहून अधिक लोकसंख्या असणाऱ्या सातारावासीयांचीही यामुळे अडचण होत आहे. या रोडवरील पथदिवे गेल्या एक वर्षापासून बंद आहेत. याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे सर्रासपणे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या तीन फुटांच्या खड्ड्यात तत्काळ पॅचवर्क करण्यात यावे, अशी मागणी िनरंजन पाध्ये, हनुमंत माने, अभय जोशी यांनी केली आहे.
मी कर्तव्य बजावले
नोकरीपेक्षा अपघात वाचवणे महत्त्वाचे आहे. मी ज्याप्रमाणे खड्ड्यात पडलो त्याप्रमाणे दुसरे कोणी पडू नये म्हणून मी माझे कर्तव्य बजावले.
समाधान साळुंके, दक्ष तरुण
तत्काळ खड्डा बुजवा
रात्री दहाच्या सुमारास खड्ड्यात गाडी अादळली आणि खाली पडलो. गाडीची किल्लीही पाण्यात पडली. खड्ड्यात शोध घेऊनही किल्ली सापडली नाही. हा खड्डा तत्काळ बुजवला पाहिजे.
अभय जोशी, वाहनचालक
संबंधितांना सूचना देतो
बीड बायपास रोड हा जागतिक बँकेच्या अखत्यारित येतो. मी तत्काळ या खड्ड्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देतो.
के. टी. वाघ, उपअिभयंता, सा.बां.विभाग