आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad Boy Give Trainging Of Coriography To Bollywood

बॉलीवूड दिग्गजांना दिले औरंगाबादी कोरिओग्राफरने धडे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - सिंगापूरमध्ये पार पडलेल्या आयफा अवॉर्ड सोहळ्याचे प्रसारण शनिवारी रात्री स्टार वाहिनीवर झाले. आयफाच्या भव्य रंगमंचावर सादर झालेल्या नेत्रदीपक नृत्याविष्काराची ‘बांधणी’ केली आहे ती बॉलीवूडमध्ये स्थिर होऊ पाहणार्‍या औरंगाबादच्या अनिल दांडगे या 29 वर्षीय कोरिओग्राफरने. प्रख्यात नर्तक प्रभुदेवासह त्याने ही किमया केली.
सहा वर्षांपूर्वी अनिल सिंगापुरात स्थायिक झाला. ‘गोल्डन लॅँड मार्क’ या भागात त्याची बॉलीवूड डान्स इन्स्टिट्यूट आहे. हिपॉप, सालसा या पाश्चात्त्य नृत्यप्रकारांबरोबरच पंजाबी आणि लावणीसह मराठी नृत्यसुद्धा तो शिकवतो. यंदाच्या आयफा अवॉर्ड सोहळ्याचा मुख्य नृत्य दिग्दर्शक प्रभुदेवा होता. अनेक चित्रपटांमध्ये प्रभुदेवासोबत काम केले असल्यामुळे त्याने अनिलला सहायकाचे काम करण्याची संधी दिली. त्यामुळे साहजिकच आयफा सोहळ्यात सहभागी बिपाशा बसू, शाहिद कपूर, रणबीर कपूर, गोहर खान आदी दिग्गज नट-नट्यांना त्याने तालावर नाचवले. अनिलच्या विद्यार्थ्यांनाही या रंगमंचावर नृत्यकला सादर करण्याची संधी मिळाली.
आयुष्याला कलाटणी देणारा प्रसंग - लहानपणापासून नृत्याची आवड असल्यामुळे अनिल दांडगेने त्याचा गुरू शैलेश गिरी यांच्याकडून नृत्याचे प्राथमिक धडे गिरवले. 1999 मध्ये त्याने उस्मानपुर्‍यात ‘सिने सायक्लॉन’ डान्स क्लास सुरू केला होता. त्याच्या याच क्लासमधील अँनी इसाक या विद्यार्थिनीने ‘बुगी बुगी’मध्ये धमाल उडवून दिली होती. अनिलची ही करामत बघून प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य यांनी अनिलला बोलावून घेतले. हा प्रसंग त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. औरंगाबादच्या क्लासेसची जबाबदारी धाकटा भाऊ सुशीलवर सोपवून त्याने मुंबई गाठली. गणेश आचार्य यांच्यासोबत त्याने ‘जोधा अकबर’, ‘वेलकम’, ‘गोलमाल’, ‘रिटर्न्‍स’, ‘डॉन’, ‘संडे’, ‘शिवाजी द बॉस’ आदी अनेक चित्रपटांसाठी ट्रेनर आणि डान्सर म्हणून काम केले.
स्वत:चे जग स्वत:च निर्माण करा - मी स्थानिक कलावंत आहे, असा न्यूनगंड कधीच बाळगला नाही. आपल्याला काय करायचे आहे हे नेमके माहीत असेल तर आपण नक्की यशस्वी होऊ शकतो. हे क्षेत्र करिअर म्हणून निवडताना त्या क्षेत्रात स्वत:ला वाहून घेणे आवश्यक आहे.अनिल दांडगे, कोरिओग्राफर