आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
औरंगाबाद - इंटरनॅशनल डेबिट कार्ड चोरून त्याद्वारे सुमारे 47 हजारांची खरेदी करून घरमालकाला गंडा घालणार्या बंटी-बबलीच्या जोडीला शनिवारी दुपारी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सीसीटीव्ही कॅमेरा फुटेजच्या मदतीने अटक केली. गारखेड्यातील विजयनगर येथे हा प्रकार घडला.
विजयनगरमधील श्यामसुंदर मोताळे यांच्या घरी एक दाम्पत्य तीन मुलांसह राहते. गुरुवारी रक्षाबंधन असल्यामुळे बुधवारी रात्री भाडेकरूची मुलगी संगीता (नाव बदलले आहे) मेंदी काढण्यासाठी म्हणून मोताळे यांच्या घरी गेली. त्या वेळी श्यामसुंदर यांच्या पत्नी कविता मोताळे घरी एकट्या होत्या. त्यामुळे मेंदी काढल्यानंतर संगीता तिथेच झोपली व सकाळी सातच्या सुमारास उठून घरी गेली. शनिवारी जेव्हा श्यामसुंदर मोताळे कुवेतहून परतले तेव्हा त्यांनी पत्नी कविताला त्यांच्या एचडीएफसीच्या अकाउंटवर मोठी रक्कम टाकल्याचे सांगितले. खरेदीसाठी त्यांनी एटीएम डेबिट कार्ड शोधले, पण ते त्यांना सापडले नाही. त्यानंतर त्यांनी शुक्रवारी एटीएम हरवल्याची तक्रार देत नवीन एटीएमसाठी बँकेत अर्ज केला. तसेच चेकद्वारे एक लाख पन्नास हजार बँकेतून काढले.
त्यानंतर घरी येऊन ई-मेल अकाउंट तपासले असता त्या कार्डवरून खरेदी केले असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार केली. तक्रारीमध्ये कविता यांनी संगीतावर संशय असल्याचे नमूद केले. त्यानुसार कारवाई करत पोलिसांनी प्रोझोन मॉल, स्टार बझार येथे जाऊन त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज मिळवले. त्यामध्ये संगीताची ओळख पटली.
मोताळे यांच्याच दुसर्या खोलीत भाड्याने राहणार्या नकुल शेषराव चव्हाण याला संगीताने गिफ्ट म्हणून जीन्सची पँट आणि शर्ट दिला. तसेच खरेदी केलेले सोन्याचे दागिने मोडून त्याला पाच हजार रुपयेही दिले. या कार्डवरून सराफा बाजारातील बाबुलाल बेचरभाई ज्वेलर्स, राजेश ज्वेलर्स येथून दागिने खरेदी करण्यात आले होते. तर प्रोझोन मॉलमधून कपड्यांची खरेदी करण्यात आली. एकूण 46 हजार 458 रुपयांची खरेदी या कार्डद्वारे केली.
या दोघांनी या पैशातून शिर्डी, राजूर येथे देवदर्शन केल्याचेही सांगितले. पोलिसांनी दोघांविरुद्ध मुकुंदवाडी ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक अविनाश आघाव, उपनिरीक्षक विश्वास पाटील, जमादार दीपक ढोणे, संदेश कीर्तिकर, नाईक प्रदीप धनवे, नितीन चौधरी, विक्रम वाघ, महेश उगले, दादासाहेब झारगड, विवेक कदम, मंजुळा नागरे यांनी कारवाई केली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.