आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad Cancer Hospital Issue Harassment To Patient

अक्षम्य दुर्लक्ष: औषधी आणली तरच कॅन्सर हॉस्पिटलात उपचार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- उद्घाटनाच्या चार महिन्यांनंतरही कॅन्सर हॉस्पिटलची दुर्दशा काही कमी होण्याची सध्यातरी चिन्हे नाहीत. एकीकडे हॉस्पिटलसाठी स्वतंत्र बजेटची सोय नसतानाच, दुसरीकडे जीवनदायी योजनेंतर्गत पुरेसा निधी मिळत नसल्याने रुग्णांना औषधी मिळणे कठीण झाले आहे. परिणामी, बहुतांश औषधी बाहेरून आणल्याशिवाय रुग्णांवर उपचार करणे शक्य नसल्याची स्थिती अनेक महिन्यांपासून कायम आहे.

मराठवाड्यातून नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातून मोठय़ा आशेने बघितल्या जात असलेल्या शासकीय विभागीय कॅन्सर हॉस्पिटलच्या वाटेत पहिल्यापासूनच अडथळे येत आहेत. हॉस्पिटलची इमारत व अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध झाली असताना आधी पदांच्या निर्मितीला प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी, तर नंतर वित्तीय मान्यतेसाठी प्रतीक्षा करावी लागली. त्यानंतर पुन्हा एकदा तांत्रिक पदनामावलीत बदल करण्यामध्ये वेळ गेला. एकूण 350 पदांपैकी केवळ सव्वाशे पदे भरलेली असताना राजकीय सरशीसाठी घाईघाईत कॅन्सर हॉस्पिटलचे उद्घाटन उरकण्यात आले. उद्घाटनासाठी काँग्रेसवर कुरघोडी करण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यशस्वी झाला असला तरी हॉस्पिटलचे प्रश्न मात्र तसेच अनिर्णीत राहिले.

आज उद्घाटनाला चार महिने उलटले; पण हॉस्पिटलसाठी स्वतंत्र बजेट मिळालेले नाही. घाटीला मिळणार्‍या पाच कोटी 32 लाखांच्या निधीतूनच कॅन्सर हॉस्पिटलला निधी दिला जात आहे. घाटीला आधीच औषधांचा मोठय़ा प्रमाणावर तुटवडा जाणवत असताना, कॅन्सर हॉस्पिटलला निधी द्यावा लागत आहे. परिणामी, दोन्हीकडे औषधांचा तीव्र तुटवडा जाणवत आहे. सद्य:स्थितीत बहुतांश औषधी बाहेरून आणली तरच कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपचार होऊ शकतात, अशी एकंदर परिस्थिती आहे.

बजेट नसताना का सुरू केले?
स्वतंत्र बजेट नसताना कॅन्सर हॉस्पिटल का सुरू केले? हॉस्पिटलमध्ये अनेक त्रुटी असल्याने त्याचा परिणाम रुग्णांवर होत आहे. आज किमोथेरपी किंवा इतर कुठलेही औषध आणल्याशिवाय हॉस्पिटलमध्ये उपचार होऊ शकत नाही, ही गंभीर परिस्थिती आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या राजकारणाचा फटका रुग्णांना सोसावा लागतो आहे. हा प्रश्न लवकरात लवकर सोडवला नाही तर भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात येईल. डॉ. महेश मोहरीर, प्रदेश उपाध्यक्ष, डॉक्टर्स सेल (भाजप).

आठ दिवसांत प्रश्न मिटेल
कॅन्सरच्या औषधांसाठीची नवी दरनिविदा (रेट कॉन्ट्रॅक्ट) नुकतीच आली आहे. त्यामुळे दरनिविदेवरील औषधी मागवण्यात आली असून येत्या आठ-दहा दिवसांत औषधी मिळण्यास सुरुवात होईल. डॉ. पी. एल. गट्टाणी, वैद्यकीय अधीक्षक, घाटी.

प्राधान्याने पाठपुरावा सुरू
कॅन्सर हॉस्पिटलच्या विविध प्रश्नांसंदर्भात मी विधानसभेत लक्षवेधी सूचना (एलएक्यू) मांडली होती. तसेच फेब्रुवारीच्या दुसर्‍या आठवड्यात वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्यासोबत बैठक होणार आहे. या वेळी वेगवेगळे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न असेल. सतीश चव्हाण, आमदार

‘जीवनदायी’चा योग्य लाभ मिळेना
वीस हजारांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणार्‍यांसाठी जीवनदायी योजनेअंतर्गत कर्करुग्णांना संपूर्ण उपचाराची सोय मिळते. मात्र, गेल्या सहा-आठ महिन्यांपासून शासनस्तरावर जीवनदायीचा निधी मिळत नसल्याने त्याचा गंभीर परिणाम औषधी पुरवठय़ावर होत आहे. अशा परिस्थितीमुळे रुग्णांवर बाहेरूनच औषधी विकत आणायची वेळ आली आहे. महत्त्वाचे म्हणजे कॅन्सरसाठीची सर्व औषधी महागडी असल्याने ती गोरगरिबांच्या आवाक्याबाहेरच आहे. जीवनदायी योजनेच्या फाइल मंजुरीसाठी तीन-तीन महिने लागतात व त्यामुळे सगळ्याच पातळीवर मोठी दिरंगाई होत असल्याचा आरोप होत आहे.

शस्त्रक्रियाही किरकोळच
कॅन्सर हॉस्पिटलमध्ये अजूनही केवळ किरकोळ शस्त्रक्रिया होतात, असा आरोप होत आहे. मोठय़ा तसेच गंभीर शस्त्रक्रियांना अद्यापही सुरुवात झालेली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. हॉस्पिटलसाठी ऑन्को सर्जन मिळाला नसल्याने महत्त्वाच्या शस्त्रक्रिया होणार तरी कधी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याचवेळी हॉस्पिटलमध्ये रेडिएशनचे उपचार देण्याचे कामही अत्यल्प प्रमाणात होत असल्याची माहिती मिळाली आहे.