आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोठे स्वच्छ ठेवा, अन्यथा रोज 500 रुपये दंड; कुवारफल्लीपासून सुरुवात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुवारफल्ली आणि एकूणच शहरातील गोठय़ांच्या समस्येवर डीबी स्टारने प्रसिद्ध करताच महापालिकेने गलिच्छ गोठय़ांच्या विरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. गोठे स्वच्छ करा, नाही तर रोज 500 रुपये दंड भरा, अशी नोटीसच मनपाने गलिच्छ गोठेधारकांना बजावली आहे. याची सुरुवात आजपासून कुवारफल्लीतून करण्यात आली. दरम्यान, या तीन गोठेधारकांनी नोटीस घेण्यास नकार दिल्याने त्यांच्याविरोधात मनपाने पोलिस ठाण्यात तक्रारही नोंदवली.

सुरुवातीला 9 एप्रिल 2013 रोजी डीबी स्टारने गोठय़ांचा प्रश्नाला वाचा फोडली होती. त्यानंतर 6 आणि 8 जुलै रोजी कुवारफल्लीतील गोठय़ांचा प्रश्न मांडला. गोठय़ांमुळे पसरणारी रोगराई, विद्यार्थ्यांना होणारा त्रास, रस्त्यावर पसरणारी घाण आणि अरुंद झालेल्या गल्ल्यांच्या प्रश्नावर वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर पुन्हा एकदा शहरातील गोठय़ांची समस्या ऐरणीवर आली. खासदार चंद्रकांत खैरे, महापौर कला ओझा व मनपा अधिकार्‍यांनी कुवारफल्लीत जाऊन गोठय़ांची पाहणी केली व जरिवाला या ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी दांपत्याची भेट घेतली. खासदार खैरे यांनी वर्षभरात सर्व गोठे शहराबाहेर हलवण्याचे आश्वासन दिले. तोपर्यंत गोठे स्वच्छ करण्याची मोहीम तरी घ्या, अशी विनंती जरिवाला दांपत्याने केली होती. त्याची दखल घेत मनपाच्या पशुसंवर्धन विभागाने सोमवारी सकाळीच गोठे तपासणी मोहीम सुरू केली.

पोलिसांत तक्रार : पशुसंवर्धन अधिकारी बी. एस. नाईकवाडे यांच्या आदेशाने सोमवारी सकाळी साडेसात वाजताच मनपाचे पथक कुवारफल्लीत पोहोचले, परंतु तेथील दोन गोठेधारक व एका तबेलाधारकाने या नोटिसा न घेता पथकाशी हुज्जत घातली. त्यामुळे या तिन्ही गोठेधारकांविरोधात सिटी चौक पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

कडक मोहीम राबवणार
गोठे तपासणी मोहिमेत जे गोठेधारक सहकार्य करणार नाहीत त्यांच्याविरोधात आम्ही पोलिसांत तक्रार देणार आहोत. जोपर्यंत गोठे शहराबाहेर जात नाहीत तोपर्यंत गोठे स्वच्छ ठेवावेत, अन्यथा पाचशे रुपये दंड लागेल, अशा नोटिसा आम्ही गोठेधारकांना देत आहोत.
-बी. एस. नाईकवाडे, पशुसंवर्धन अधिकारी, मनपा