आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सात रस्त्यांचे काँक्रिटीकरण; 14 रस्त्यांच्या निविदा दोन दिवसांत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - बहुचर्चित रस्त्यांच्या कामांच्या निविदा आता कोणत्याही क्षणी जारी केल्या जाणार असून पहिल्या टप्प्यात 14 रस्ते करण्यात येणार असून त्यापैकी 7 रस्त्यांचे व्हाइट टॉपिंग अर्थात काँक्रिटीकरण केले जाणार आहे. दुसरा टप्प्यातील निविदाही आचारसंहितेच्या आधी काढण्यात येतील असे महापौर कला ओझा यांनी शुक्रवारी जाहीर केले.
गेल्या दीड महिन्यापासून शहरातील रस्त्यांची कामे कधी सुरू होणार या प्रश्नाचीच चर्चा होत आहे. राजकीय सुंदोपसुंदी, पैशाची तरतूद आदी कारणांमुळे हे काम लांबत गेले. यादीवरून सुरू असलेल्या मारामार्‍या आता जवळपास थांबल्या असून येत्या दोन दिवसांत या कामांच्या निविदा निघणार आहेत. महापौर कला ओझा यांनी सांगितले की, दोन टप्प्यांत रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. त्यात पहिल्या टप्प्यात 14 रस्त्यांची कामे सुरू केली जातील. त्यापैकी सात रस्त्यांचे व्हाइट टॉपिंग केले जाणार आहे. अत्यंत खराब झालेल्या आणि पाण्याने सातत्याने खराब होत असलेल्या रस्त्यांवरील डांबराचा जुना थर खरवडून त्यावर रस्त्याच्या गरजेनुसार जाडीचे काँक्रिटीकरण अर्थात व्हाइट टॉपिंग केले जाणार आहे. त्या म्हणाल्या की जळगाव रोड ते मध्यवर्ती जकात नाका हा अत्यंत खराब रस्ता असून त्याचे व्हाइट टॉपिंग करून मजबुतीकरण केले जाईल. शिवाय क्रांती चौक ते पैठण गेट आणि आनंद गाडे चौक ते एसएससी बोर्ड हे रस्तेही व्हाइट टॉपिंगच्या मदतीने केले जाणार आहेत. हे दोन्ही रस्ते सिमेंट काँक्रिटचा होत असलेल्या रेल्वे स्टेशन ते क्रांती चौक रस्त्याला जोडणारे रस्ते असल्याने ते चांगलेही दिसेल. शिवाय या दोन्ही रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली असून त्यावरील वाहतूक व पावसाळ्यात साचणारे पाण्याचे प्रमाण पाहता अधिक काळ टिकणारे रस्ते करण्यासाठी व्हाइट टॉपिंग केले जाईल असे महापौर म्हणाल्या.