आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डीबी स्टार दणका: गब्बर ठेकेदारांना काळ्या यादीत टाका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- औषध फवारणीवर 83 लाखांचे बिल प्रकरणी डीबी स्टारने वृत्त प्रकाशित केल्यानंतर मनपा प्रशासनाने सिडको परिसराची पाहणी केली, बैठका घेतल्या. त्यानंतर औषध फवारणीच्या नावावर गब्बर झालेल्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचे आदेश आरोग्य सभापतींनी दिले. तसेच त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचनाही दिल्या. महापौर कला ओझा यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमणार असल्याचे सांगितले. आज झालेल्या स्थायी समितीच्या सभेत समीर राजूरकर, नारायण कुटे आणि बाळासाहेब मुंढे यांनी मुद्दा उपस्थित करून फवारणीवरील खर्चाचा अहवाल सादर करण्याच्या सूचना आरोग्य अधिकार्‍यांना दिल्या.

शहरातील सहा प्रभागांतील डासांचा नायनाट करण्यासाठी जुने शहर वगळता नव्या शहरासाठी सहा ठेकेदार नेमले आहेत. त्यासाठी 2011-12 या वर्षात तब्बल 82 लाख 80 हजार रुपये खर्च करण्यात आले. 12 महिने औषध फवारणी केली जात असल्याचा पालिकेचा व ठेकेदारांचा दावा आहे. मात्र, कुठेही औषध फवारणी होत नसल्याच्या तक्रारी सिडको, हडकोतील रहिवाशांसह नगरसेवकांनी पालिकेकडे केल्या. तरीही कोणतीच कारवाई झाली नाही. अखेर नागरिकांनी डीबी स्टारकडे कैफियत मांडली. त्यावर डीबी स्टारने सखोल तपास करून 1 मार्च रोजी ‘मच्छरांनी केले ठेकेदार गब्बर’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले.

आरोग्य विभाग कामाला लागला : या प्रकरणाचा डीबी स्टार, नागरिक आणि नगरसेवकांनी पाठपुरावा केला. त्यानंतर आरोग्य अधिकारी, आरोग्य सभापती यांनी 2 मार्च रोजी पहाटेपासूनच सिडको एन-5, एन-6, एन-2 अंबिकानगर, संतोषीमातानगर परिसरात नागरिकांच्या भेटी घेतल्या. औषध फवारणी होते की नाही? असा सवाल स्थानिक रहिवाशांना केला असता कुठेच फवारणी होत नसल्याच्या प्रतिक्रिया मिळाल्या. त्यानंतर या ठेकेदारांना काळ्या यादीत टाका आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करा, असे आदेश सभापती बबन नरवडे यांनी आरोग्य अधिकार्‍यांना दिले.

दंडात्मक कारवाई करा
आरोग्य अधिकारी डॉ. जयर्शी कु लकर्णी यांच्या दालनात सर्व ठेकेदारांसह आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी आणि प्रमुख जीवशास्त्रज्ञांची कानउघाडणी केली. दोषी ठेकेदारांची नावे ब्लॅकलिस्टमध्ये टाकून उर्वरित देयके तत्काळ थांबवून दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश आरोग्य अधिकारी डॉ. कु लकर्णी यांना दिले आहेत.
-बबन नरवडे, आरोग्य सभापती, मनपा

अहवाल सादर करा
तिजोरीत ठणठणाट असतानाही औषध फवारणीच्या नावाखाली वर्षाकाठी 83 लाख रुपयांची देयके काढली जातात. स्थायी समितीच्या बैठकीत आम्ही हा मुद्दा उपस्थित केला आहे. औषध फवारणीवरील खर्चाचा अहवाल सादर करण्याच्या सूचना या वेळी आरोग्य अधिकारी डॉ. जयर्शी कुलकर्णी यांना केल्या आहेत.
-समीर राजूरकर,स्थायी समिती सदस्य

चौकशी समिती नेमणार
आरोग्य विभागाला माहिती सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र, माहिती देण्यात आली नाही. ठेकेदारांना हजर करण्याचे आदेशही दिले होते. त्यांनाही हजर केले नाही. माझ्या वॉर्डात दोन वर्षांपासून औषध फवारणी झालेली नाही. मग लाखो रुपये कसे उकळले जातात? हा प्रश्न उपस्थित होतो. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्याचा प्रस्ताव आयुक्तांना सादर करणार आहे.
-कला ओझा, महापौर