आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad Cidco Managing Director Sanjay Bhatiya At Aurangabad

1140 घरांच्या वाळूज-सिडको प्रकल्पाला वेग देणार: भाटिया

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- सिडकोच्या वतीने वाळूज महानगर-1 मध्ये मध्यम व अल्प उत्पन्न गटासाठी 1140 घरांची योजना राबवण्याचे सूतोवाच सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी गुरुवारी (9 मे) दै. ‘दिव्य मराठी’शी बोलताना केले. या प्रकल्पाला वेग देण्यासाठी सिडकोचे शहरातील मुख्य कार्यालय वाळूजमध्ये हलवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती झाल्यानंतर भाटिया यांची ही पहिलीच भेट आहे. दोन दिवसांच्या दौर्‍याचा प्रारंभ त्यांनी आज सकाळी वाळूज महानगराची पाहणी व आढावा घेऊन केला. या वेळी त्यांनी एमआयडीसीचे जलशुद्धीकरण केंद्र, गोलवाडी भागातील साऊथ सिटी परिसर, ग्रोथ सेंटर, देवगिरी नगर, साईनगर तसेच समाज मंदिरासह अन्य प्रकल्पांच्या संदर्भात अधिकार्‍यांशी चर्चा केली. वाळूज परिसराच्या विकासासाठी सिडको प्रशासन क टिबद्ध आहे. पथदिवे, पाणीपुरवठा, रस्ते आदी कामांना गती दिली जाईल. प्रकल्प क्रमांक दोनमध्ये 6 हेक्टर जागा पडून असल्याने त्यावर कोणती विकासकामे करायची त्यासंदर्भातील निर्णय लवकरच घेतला जाईल. मात्र, हा विकास साधताना शेतकरीवर्गाचे सहकार्य असणे गरजेचे आहे. त्यांनी जमिनी दिल्या तरच सिडकोला विकास करणे शक्य होणार आहे. प्रकल्प क्रमांक चारला शेतकर्‍यांचा विरोध होत असेल तर तो रद्द करण्यात येईल, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. या वेळी प्रकल्पबाधित शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष रंगनाथ काळे म्हणाले की, सिडको नगर क्रमांक चारच्या विकासकामाला शेतकर्‍यांचा कायम पाठिंबाच राहील. प्रकल्पासाठी जमिनी देण्यास विरोध नाही. मात्र, सिडको प्रशासनाने तुटपुंजा मोबदला न देता आजचा बाजारभाव द्यावा. सिडकोने जर 15 वर्षांपूर्वी जमिनी घेतल्या असत्या तर आम्हीही 3 ते 4 लाख रुपयांचा भाव घेतला असता. शेतकरी स्वत:ची जमीन देऊन स्वत:चा संसार उद्ध्वस्त करतील का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

असा आहे प्रकल्प
अत्यल्प उत्पन्न गटामध्ये 30 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या 218 सदनिका, अल्प उत्पन्न गटासाठी 40 चौ. मी. क्षेत्रफळाच्या 146, मध्यम उत्पन्न गटासाठी 50 चौ. मी. क्षेत्रफळाच्या 588, तर उच्च् उत्पन्न गटासाठी 70 चौ. मी. क्षेत्रफळाच्या 154 सदनिका, 90 चौ. मी. क्षेत्रफळाच्या 34 सदनिका तयार केल्या जाणार आहेत. या योजनेसाठी सिडकोच्या वतीने करण्यात आलेल्या मागणी सर्वेक्षणात 30 हजार अर्ज प्राप्त झाले होते.

सिडकोचे कार्यालय वाळूजला
रखडलेल्या वाळूज प्रकल्पास गती देण्यासाठी औरंगाबाद येथील सिडकोचे कार्यालय वाळूजला हलवण्याचा निर्णय भाटिया यांनी घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. भाटिया सिडकोचे प्रशासक म्हणून कार्यरत असताना वाळूज येथील प्रकल्प सुरू करण्यात आला होता. त्यांच्या ड्रीम प्रोजेक्टची मध्यंतरीच्या काळात दुरवस्था झाली होती. आता ते सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक झाल्यामुळे या प्रकल्पाला पुन्हा एकदा गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

गुंतवणुकीतून फायद्याचा प्रथम विचार
वाळूज प्रकल्पात केली जाणारी गुंतवणूक प्रशासनासाठी किती फायद्याची ठरेल याबाबत प्रथम विचार होणार आहे. अभ्यास समितीचा अहवाल डोळ्यांसमोर ठेवून विकासाबाबत घेतला जाणार असल्याचे या वेळी भाटिया यांनी स्पष्ट केले. झालरक्षेत्रातील सातारा परिसराच्या विकासकामाचा ड्राफ्ट प्लॅन तयार आहे. सिडको आता कात टाकून विकासकामांत जोखीम घेऊनच उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले.