आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा क्रांती मोर्चा: विराट गर्दीचा भाग झाल्याचा औरंगाबादकरांना अत्यानंद!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मुंबईत धडकलेल्या मराठा क्रांती मोर्चात औरंगाबाद शहर तसेच जिल्ह्यातून नेमके किती जण गेले होते याचा अंदाज बांधणे काहीसे अवघड आहे. कारण आपापल्या परीने जो तो मोर्चात सहभागी होण्यासाठी गेला होता. मुंबईतील विराट गर्दीचा भाग आपल्याला होता आले याचा आनंद असल्याचे अनेकांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले. आपापली भाजीभाकरी सोबत ठेवा, कारण मुंबईत अाबाळ होऊ शकते, असे आवाहन संयोजकांच्या वतीने केले होते तरीही अनेकांनी सोबत शिदोरी ठेवली नाही. मात्र मुंबईत किंवा परतीच्या प्रवासात अजिबात अाबाळ झाली नसल्याचे अनेकांनी सांगितले. 
 
या मोर्चाची तयारी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. मुंबईत मोठी गर्दी होणार असल्याने मोर्चेकऱ्यांच्या खाण्यापिण्याची अाबाळ होऊ शकते, असे सांगण्यात आले होते. त्यामुळे मोर्चेकऱ्यांनी आपली सोय स्वत:च करावी, अशी सूचना दिली होती. त्यानुसार काहींनी शिदोरी सोबत ठेवली, तर काहींनी प्रवासात तसेच मुंबईत हॉटेलिंगचा आनंद घेतला. कोठेही कशाची कमतरता जाणवली नसल्याचे सांगण्यात आले. ट्रॅफिक जाम होऊ शकते या शक्यतेने अनेक जण मंगळवारी सकाळीच मुंबईकडे निघाले होते. सायंकाळपूर्वीच त्यांनी मुंबई गाठली. 

काही जण मंगळवारी रात्री उशिरा रवाना झाले. येथूनच जेवण करून काही जण निघाले होते. काहींनी वाटेत नगर, पुणे अशा ठिकाणी जेवणे आटोपली. सकाळी नाष्ट्याची व्यवस्था काही ग्रुपने केले होती, तर काहींनी मुंबईच्या प्रसिद्ध वडापावचा आनंद घेतला. विक्रमी गर्दी होणार याचा अंदाज असल्याने स्थानिक हॉटेल तसेच फेरीवालेही तयारीत होते. त्यामुळे कोणालाही काहीही कमी पडले नसल्याचा अनुभव अनेकांनी सांगितला. 
 
कुणी नेली स्वत:ची शिदोरी 
रेल्वेमार्गे गेलेल्या मोर्चेकऱ्यांना प्रत्येक स्थानकावर खाण्यापिण्याची चंगळ असल्याचे दिसून आले. चिकलठाणा येथील अख्खे कुटुंब मोर्चात सहभागी होण्यासाठी दोन मोटारींनी गेले होते. त्यांनी स्वत:ची शिदोरी सोबत नेली होती. 
बातम्या आणखी आहेत...