आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबादतील शहर बससेवा अजूनही तोट्यातच!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शहर बस चालवण्याची महापालिकेची कुवत नसल्याने एसटीने दोन वर्षांपूर्वी सुरू केलेली शहर बससेवा तोट्यात सुरू आहे. तरीही प्रवाशांच्या सेवेसाठी शहरात 35 बसेस सुरू आहेत. मात्र, या सेवेला प्रवासी, पोलिस आणि पालिके च्या सहकार्याची गरज हवी असल्याची अपेक्षा महामंडळाने व्यक्त केली आहे. दरम्यान, येत्या आठवडाभरात औरंगपुरा ते विद्यापीठ, मकई गेट, हनुमान टेकडी ही बससेवा सुरू होणार आहे.

पालिकेने सुरू केलेली शहर बससेवा कोमात गेल्यानंतर एसटी महामंडळाने 15 ऑगस्ट 2011 रोजी शहर बससेवेला प्रारंभ केला. तेव्हापासून ही सेवा तोट्यातच सुरू आहे. मात्र, शहरातील मुख्य रस्त्यावर खासगी वाहनांचा जास्त वावर आणि शहर बससेवेला प्रवासी प्रतिसाद देत नसल्याने या बससेवेचा भारांक 41 इतका आहे.

किमान हा आकडा 65 असल्यास ना नफा ना तोटा धर्तीवर देणे परवडले असते. तरीही दोन वर्षांपासून तोटा सहन करून एसटीकडून ही सेवा दिली जात आहे.

तीन गेटमुळे बससेवेला अडथळा
मकई गेट, पाणचक्की गेट आणि बारापुल्ला गेट मधून शहर बस सेवेला पोलिस आणि पालिकेने सहा महिन्यापूर्वीच बंदी घातली आहे. त्यामुळे या भागातील सेवा खंडित झाली आहे. मात्र, खासगी बस या गेटमधून ये-जा करतात. पोलिसही त्यांना थांबवू शकले नाहीत.

विद्यापीठ, मकबरा, हनुमान टेकडीकडे धावणार बस : येत्या आठवडाभरात पिद्यापीठ, मकबरा, हनुमान टेकडी या भागात शहरबस धावणार आहेत. त्याचे नियोजन सुरू असून त्या सुरू झाल्यास विद्यापीठात जाणार्‍या येणार्‍या विद्यार्थी आणि मकबरा आणि हनुमान टेकडीकडे जाणार्‍या पर्यटक आणि नागरिकांची सोय होणार आहे.

पालिकेने परवानगी द्यावी
अवैध वाहतुकीबरोबरच मकई गेट, बारापुल्ला गेट आणि पाणचक्की गेटमधून जायला शहर बसला पोलिस आणि पालिकेने परवानगी द्यावी. कारण, नागरिकांच्या सोईसाठी ते गरजेचे आहे.
-सुभाष देवकर, सदस्य, सल्लागार समिती एस.टी.महामंडळ

किती होतात फेर्‍या?
बजाजनगर ते औरंगपुरा 96 फेर्‍या, वाळूज ते औरंगपुरा 80 फेर्‍या, रेल्वे स्टेशन ते हसरूल 32 फेर्‍या, मध्यवर्ती बसस्थानक ते सिडको 125 फेर्‍या, मध्यवर्ती बसस्थानक ते टी.व्ही.सेंटर 100 फेर्‍या, शहागंज ते स्टेशन 50 फेर्‍या चिकलठाणा ते बाबा पेट्रोल पंप 56 फेर्‍या अशा एकूण रोज 7 हजार 50 किलोमीटर या बस धावतात. यासाठी 132 वाहक आणि चालक कार्यरत आहेत.