आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात बससेवेसाठी आता राष्ट्रीय निविदा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगाबादची शहर बस सेवा चालवण्याचा निर्णय पालिकेने घेतला असून त्याची प्राथमिक प्रक्रिया सुरू झाली आहे. यापूर्वीच्या अपयशातून धडा घेऊन ही सेवा चालवण्यासाठी देशभरातून स्पर्धक यावेत, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यामुळे पुढील महिन्यात बससेवा चालवण्यासाठी निविदा मागवण्यात येणार आहेत. त्यासाठी राष्ट्रीय स्तरावर जाहिराती दिल्या जाणार असल्याचे महापौर त्र्यंबक तुपे यांनी सांगितले.

शहरातील भाजप नेत्याच्या नातेवाइकांची ही सेवा चालवण्याची इच्छा आहे. त्यासाठी त्यांनीच काही अटी घातल्याचे बोलले जाते. परंतु असे कोणी एक जण आला अन् त्याला बस चालवण्यासाठी दिली असे होणार नसल्याचे महापौर तुपे यांनी स्पष्ट केले आहे. रीतसर प्रक्रिया केली जाईल तसेच देशपातळीवर जाहिराती देऊन स्पर्धकांना निमंत्रित केले जाणार असल्याचे तुपे यांनी म्हटले आहे. लवकरच निविदेसाठी जाहिराती पालिकेकडून दिल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्य परिवहन महामंडळाने शहर बस सेवा चालवण्यास नकार दिल्याने २००६ मध्ये पालिकेने ही सेवा सुरू केली होती. तेव्हा राज्य पातळीवर निविदा देण्यात आल्या होत्या. अकोल्याच्या अकोला प्रवासी सहकारी संस्थेकडे ही सेवा देण्यात आली होती. मात्र अवघ्या चारच वर्षांत ती बंद करावी लागली. पालिकेने प्रारंभी घातलेल्या अटी नंतर शिथिल करण्यात आल्याने ठेकेदाराने पालिकेला नंतर एकही पैसा दिला नाही. पालिकेला रॉयल्टी मिळाली नसल्याचे दु:ख नाही, परंतु त्याने नंतर ही सेवाही चालवली नाही. शहरात शंभरावर बसेस चालतील, असा दावा त्याने प्रारंभी केला होता. परंतु सेवा बंद झाली तेव्हा बसची संख्या ३६ इतकीच होती. मागील पंधरा दिवसांपासून पोलिस आयुक्तांनी शहरातील डिझेल रिक्षांवर बंदी घातल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. अशाच परिस्थितीत जर सक्षम बससेवा शहरात दाखल झाली तर प्रवाशांची सोय होऊ शकेल. त्यामुळेच तातडीने प्रक्रिया पूर्ण करण्यावर पालिकेचा भर असल्याचे तुपे यांनी सांगितले.

चालवायची असेल तर...
पहिल्याच टप्प्यात किमान १०० बस रस्त्यावर असायला हव्यात. तसेच मुख्य रस्त्यांसोबत लहान वसाहतीमध्येही बस पोहोचायला हवी. याचा अभ्यास करूनच निविदा काढली जाईल.

इतिहास असा
१९७५ पासून शहरात ही सेवा सुरू आहे. प्रारंभीपासून ही सेवा तोट्यात असल्याचे महामंडळाच्या वतीने सांगण्यात येत होते. त्यामुळे २००५ मध्ये राज्यात शहर बस सेवा महामंडळ चालवणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे २००६ मध्ये पालिकेने ही सेवा खासगी तत्त्वावर सुरू केली. २०१० मध्ये ती बंद पडल्याने पुन्हा ती महामंडळाने चालवण्यास घेतली. आता ही सेवा पुन्हा पालिका स्वत:कडे घेणार आहे.