आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाचे दुर्लक्ष - सफाई कागदावरच, नाले तुंबले; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मे महिन्यात करावयाची नालेसफाई मनपाने निम्मा पावसाळा संपला तरी केली नसल्याने शहरातील सर्वच नाले तुंबलेले आहेत. डेंग्यूच्या साथीत बाकीच्या साथरोगांची भर पडण्याची मनपा वाट पाहत आहे, तर जोरदार पाऊस आल्यावर नाल्यातील कचरा वाहून गेल्यावर बिले सादर करण्याची ठेकेदार वाट पाहत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

औरंगाबाद शहरातील बहुतेक वसाहतींतून नाले वाहतात. या नाल्यांची साफसफाई न केल्यास आसपासच्या परिसरात राहणा-या नागरिकांच्या जिवावर बेतण्याची वेळ येते. दरवर्षी तुंबलेल्या नाल्यांमुळे वसाहतींत पाणी जाण्याचे प्रकार तर घडतातच, पण नाल्यात असणा-या कच-यामुळे रोगराईचे प्रमाण झपाट्याने वाढते. दरवर्षी जूनच्या प्रारंभी महापालिका नाल्यांची सफाई करत असते. काही विशिष्ट ठेकेदारांनाच ही कामे पुरवली जातात. थातूरमातूर कामे करून नाल्यातील कचरा काठावरच टाकून हे ठेकेदार काम उरकतात. फोटो काढून सादर करत बिले उचलतात. ही आजपर्यंतची परंपरा मनपात आहे. यंदा त्या परंपरेला ओलांडत मनपाने कहरच केला आहे.
यंदा नालेसफाईसाठी मनपाने 3 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मात्र आता ऑगस्टचा पहिला आठवडा उलटला, पावसाळा निम्मा संपत आला तरी शहरातील एकाही नाल्याची सफाई करण्यात आलेली नाही. या संदर्भात स्थायी समितीत आणि सर्वसाधारण सभेत ओरड होऊनही कामाला प्रारंभ झाला नसल्याचे नाल्यांची पाहणी केली असता आढळून आले.
औरंगपु-यातील भाजी मंडईजवळच्या नाल्याच्या पात्रात कच-याचे ढीग साचले आहेत. काळा दरवाजाजवळच्या नाल्यात तर कच-याच्या ढिगाने पात्रच व्यापले आहे. कचरा तुंबल्याने पाणी वाहणे अशक्य बनले आहे. कहर म्हणजे मनपा शेजारच्या नाल्यातही हीच स्थिती असून मनपाचे सर्व अधिकारी, पदाधिकारी रोजच या नाल्यावरच्या पुलावरून ये-जा करतात, पण त्यांचे त्याकडे लक्ष गेलेले नाही. औरंगपु-यातून नागेश्वरवाडीपासून जाणा-या नाल्याची अवस्था अशीच असून कच-यामुळे नाल्यांचे पात्र उथळ बनले असून जोरदार पाऊस झाल्यास लगतच्या वसाहतींत पाणी घुसण्याचा सगळ्यात अधिक धोका आहे. श्रेयनगरातील दोन नाल्यांचीही साफसफाई झाली नसून लगतच्या वसाहतींना धोका निर्माण झाला आहे.

नागरिकांचे जीव घेणार का?
नाल्यांची साफसफाई व्हावी याची मागणी दोन महिन्यांपासून केली जात आहे. पण त्याचा काहीच उपयोग न झाल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. याबाबत तातडीने कारवाई करण्याची गरज असून काम न करता नालेसफाईची बिले उचलल्यास आम्हाला आमच्या पद्धतीने कारवाई करावी लागेल. नालेसफाईवर कोट्यवधींचा खर्च मनपा करते, पण सफाई कुठेच दिसत नाही. रोगराईचा धोका वाढत असताना मनपा प्रशासन आता काय नागरिकांचे जीव घेणार का, असा सवाल नगरसेवक राजू वैद्य यांनी केला आहे.
रोगराईचा धोका वाढला
नाल्यामधील कचरा मागील चार दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे कुजायला सुरुवात झाली असून सर्वच ठिकाणी दुर्गंधी पसरली आहे. साफसफाई न झाल्याने या भागांत आता आजारपणाला निमंत्रण मिळाले आहे. आधीच डेंग्यूच्या साथीने शहरास विळखा घातला असून त्यात आता इतर आजारांचा धोका वाढला आहे.