आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्ज हप्त्याच्या साडेतीन लाखांवर मारला डल्ला, ऑइल गळतीची बतावणी करत फर्निचर व्यापा-याला गंडवले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज- कारमधून ऑइल गळत असल्याची बतावणी करून फर्निचर व्यापाऱ्याचे बँक हप्त्याचे तीन लाख 50 हजार रुपये ठेवलेली बॅग तिघा भामट्यांनी पळवली. ही घटना नगर-औरंगाबाद महामार्गावरील अब्बास पेट्रोल पंपावर सोमवारी दुपारी 2.45 वाजता घडली.
जवाहर कॉलनी भागात उदयसिंग गणपतराव गायकवाड (35, रा. स्नेहवर्धन सोसायटी) यांचे घरकुल नावाचे फर्निचरचे दुकान आहे. त्यांनी वाळूजमधील अलाहाबाद बँकेकडून कर्ज घेतलेले आहे. त्याचा हप्ता भरण्यासाठी त्यांनी दुपारी 1.30 वाजता शहानूरवाडी भागातील स्टेट बँक ऑफ हैदराबादमधील खात्यातून सुमारे 3 लाख 50 हजार रुपये काढून पिशवीत ठेवत डस्टर कारने (एमएच 20 बीजे 7171) पंढरपूरकडे निघाले. त्याच वेळी अब्बास पंपावर डिझेल भरताना बॅग पळवण्याची घटना घडली. गायकवाड यांनी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाणे गाठले व घटनेची माहिती दिली. त्यावरून पोलिस उपनिरीक्षक अनिलकुमार पांडे, गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक जी. पी. ठाकूर, जमादार परमेश्वर पायगव्हाणे, अमोल शिंदे, काकासाहेब तुपे आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांची पथके लुटारूंच्या तपासासाठी रवाना झाली असून त्यांनी रेल्वेस्टेशन, बसस्थानक आदी ठिकाणी तपास मोहीम सुरू केली.एकाने ऑइल टाकले,
दुस-याने सांगितले अन् तिस-याने मारला डल्ला पैसे लुटणारे तरुण हे अंदाजे 20 ते 25 वयोगटातील होते. तिघे लुटारू सडपातळ बांध्याचे होते. पंपावरील लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑइल टाकणाऱ्या मुलाच्या अंगात रेषांचा पांढरा शर्ट, शेवाळी कलची पँट होती. तर दुचाकी चालवणाऱ्या व्यक्तीच्या अंगात आकाशी रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची पँट होती. बॅग पळवताना तिघांनी परिपूर्ण नियोजन केले होते. पंपापर्यंत तिघे एकत्र आले. त्यानंतर एकाने काही लक्षात येण्याअगोदर बोनटवर ऑइल ओतले व दुचाकीस्वाराने गायकवाड यांना ऑइल गळत असल्याचे म्हटले तर गाडी तपासेपर्यंत तिसऱ्याने बॅग लंपास केली. बॅग घेऊन तिघे जण दुचाकीवरून धूम ठोकताना परिसरातील काही जणांनी पाहिल्याचा दावा केला. तर ही घटना परिसरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याचा अंदाज आहे. गायकवाड यांनी शहरातील बँकेतून पैसे काढल्यानंतर त्यांच्यावर पाळत ठेवत वाळूजपर्यंत तिघांनी त्यांचा पाठलाग केल्याचा संशय पोलिसांना आहे. वाळूज एमआयडीसी पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.

पंपासमोरील तिसरी, वाळूजमधील चौथी घटना
वाळूज तसेच शहर परिसरामध्ये बतावणी करून वाहनातून पैसे पळवणारी टोळी वाळूजमध्ये सक्रिय आहे. मागील चार महिन्यांत वाळूजमध्ये तीन जणांना अशाच प्रकारे लुटण्यात आले आहे. आजची चौथी घटना होती. चार महिन्यांपूर्वी अब्बास पंपासमोरील एका वाहनबाजारात कार पाहण्यासाठी गेलेल्या व्यक्तीच्या गाडीतून एक लाख 80 हजार रुपये अशाच प्रकारे लुटण्यात आले. त्याच कालावधीत वाळूज सिडकोतील म्हाडा कॉलनीत राहणारा ट्रॉन्सपोर्टचालक पूर्णवादी बँकेत पैसे जमा करण्यासाठी जात असताना याच पंपासमोर त्याच्या ट्रकमधून 2 लाख लुटण्यात आले होते. तर वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यासमोरून जात असताना ट्रान्सपोर्टमधील अकाउंटंटला दुचाकीवर आलेल्या दोघांनी धक्का देत त्याच्याकडील 50 हजार रुपये लुटले होते.