आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहा कोटी 71 लाखांच्या जागेला भाडे 49 रुपये महिना!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरात मध्यवर्ती ठिकाणी दिल्ली गेट भागातील 15 हजार चौरस फुटांचा भूखंड जिल्हा परिषदेने महिना 49 रुपये अशा कवडीमोल भावाने भाड्याने दिल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. या जागेचे शासकीय मूल्य 6 कोटी 71 लाख 64 हजार असून, व्यावसायिक बाजारमूल्य 20 कोटी रुपये आहे. एन.ए. प्रिंटर हा भारत पेट्रोलियम कंपनीचा पेट्रोल पंप या जागेवर आहे.

भाड्याने दिलेल्या जागांचा विषय सोमवारी सर्वसाधारण सभेत निघाला. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी तपासणी करण्याचे आदेश दिले. याबाबत अधिक माहिती घेतली असता ही बाब निदर्शनास आली. 1963 मध्ये जि.प.ने टाकलेला पेट्रोलपंप 1970 मध्ये भारत पेट्रोलियमला दिला. पुढे वर्षभराने तो एन.ए. प्रिंटरकडे आला. दरम्यान, जागा जि.प.ची असून, त्याबाबत वाद असल्याचे कार्यकारी अभियंता भरतकुमार बाविस्कर यांनी सांगितले.

विशेष तज्ज्ञांची निवड
जिल्हा परिषदेच्या जागा शोधून त्यांची मोजणी करण्यात येईल. न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणांचा निपटारा व्हावा यासाठी विशेष तज्ज्ञांचीही तत्काळ नेमणूक करण्यात येईल. त्यानंतरच या प्रकरणी निर्णय घेतला जाऊ शकेल.’ दीपक चौधरी, मुख्य कायर्कारी अधिकारी, जि.प. औरंगाबाद

जिल्हा परिषदेकडे नोंद कमी जागेची
पेट्रोल पंपाची जागा 15 हजार चौरस फूट आहे. मात्र जिल्हा परिषदेकडील जागेची नोंद 6,219.28 चौरस फूट एवढीच आहे. त्यानुसार या जागेचा शासकीय दर 2 कोटी 77 लाख रुपये एवढा होतो. तसेच बाजारमूल्य 8 कोटी 32 लाख 32 हजार एवढे भरते.

(फोटो - एन.ए. प्रिंटर हा भारत पेट्रोलियम कंपनीचा पेट्रोल पंप या जागेवर आहे)