आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रोटोकाॅल मोडून महापौर तुपे गेले आयुक्तांच्या दालनात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महापौरांनी आयुक्तांना आपल्या दालनात बोलवायचे असते हा राजशिष्टाचार मोडत महापौर त्र्यंबक तुपे यांनी आज उपमहापौर सभागृह नेत्यांसोबत आयुक्त सुनील केंद्रेकरांच्या दालनात जात शहरातील विकासकामांबाबत चर्चा केली. रस्त्यांची कामे, करवसुली, मोकळ्या जागांच्या समस्या आदी अनेक बाबींचा ऊहापोह करणारे एक निवेदन महापौरांनी त्यांना दिले.
महापौर हे शहराचे प्रथम नागरिक असल्याने आयुक्तांनी त्यांच्या दालनात जावे असा शिष्टाचार आहे. आज तो शिष्टाचार मोडत महापौर त्र्यंबक तुपे, उपमहापौर प्रमोद राठोड सभागृह नेते राजेंद्र जंजाळ यांनी आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या दालनात जाऊन भेट घेतली. जवळपास अर्धा तास विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. शिष्टाचाराच्या विषयावर ते म्हणाले की, शिष्टाचार आहे हे बरोबर आहे पण त्यातच अडकून राहणे चांगले नाही. आपणहून त्यांना जाऊन भेटण्यात काही वावगे आहे असे मला वाटत नाही. मानपानाच्या विषयापेक्षा शहराच्या विकासाबाबत काम होणे आवश्यक आहे असा विचार करूनच आम्ही त्यांना भेटायला गेलो होतो.

काय झाले भेटीत?
आजच्या भेटीबाबत महापौर म्हणाले की, शहरातील विकास कामे उत्पन्न वाढीसाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत ४९ कलमी निवेदन आयुक्तांना दिले. त्यावर चर्चाही झाली. या निवेदनात मालमत्ता कर आकारणी, मालमत्ता करांचे पुनर्मूल्यांकन, मनपाच्या मालकीच्या जागा व्यावसायिक दृष्टिकोनातून विकसित करणे, शहरातील पथदिवे सौरऊर्जेवर चालवणे, रस्त्यांची कामे लवकर पूर्ण करणे, प्रमुख रस्त्यांचे काँक्रिटीकरण करणे, विकास आराखड्यातील रस्त्यांचे मार्किंग करून या रस्त्यांवरील अतिक्रमण काढणे, पार्किंगच्या जागेचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांवर कडक कारवाई करून या जागा खुल्या करून घेणे, चौकांच्या सुशोभीकरणात खासगी कंपन्यांचा सहभाग घेणे मनपातील रिक्त पदे तातडीने भरणे यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली आहे. आयुक्तांनीही याबाबत सकारात्मक पावले उचलू, असे सांगितल्याचे महापौर म्हणाले.