आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संत एकनाथ रंगमंदिर मार्गावरील रस्ता चकाचक, डिव्हायडर मात्र गायब

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - उस्मानपुरा चौक ते संत एकनाथ रंगमंदिरावरून पुढे स्वातंत्र्यवीर कमलाकर देशपांडे चौक या वाहतूक बेटापर्यंत जाणार्‍या रस्त्याचे रखडलेले काम अखेर झाले. डीबी स्टारने हे प्रकरण लावून धरल्याने या कामासाठी 10 लाखांचा निधी मंजूर झाला व रस्ता चकाचक झाला; मात्र रस्त्यावर डिव्हायडरच नाहीत. शिवाय जुने डिव्हायडर अपघाताला कारण ठरत आहेत. त्यामुळे त्याकडेही लक्ष देणे तितकेच गरजेच आहे.

उस्मानपुरा चौकापासून ते स्वातंत्र्यवीर कमलाकर देशपांडे चौक मार्गे श्रेयनगरकडे जाणार्‍या या एक किलोमीटर लांबीच्या रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झाली होती. खडी, खड्डे आणि माती यामुळे या मार्गावरून जाताना वाहनधारकांना प्रचंड कसरत करावी लागत होती. पावसाळ्यात तर या मार्गावर जाणे वाहनधारक टाळत असत. रिक्षावालेही या भागात जाण्यास सहजासहजी राजी होत नसत. गेल्या पाच वर्षांपासून हीच परिस्थिती होती. वाहनधारकच नव्हे तर या भागातील रहिवासीही या भयंकर रस्त्यामुळे त्रस्त झाले होते. हा रस्ता मुख्य बाजारपेठेत असल्याने मालवाहू रिक्षांची सतत वर्दळ असते. तसेच रस्त्याच्या आसपास शहरातील अनेक जुन्या वसाहती असल्याने लवकरात लवकर रस्ता दुरुस्ती व्हावी, अशी सगळ्यांचीच मागणी होती. परंतु त्यात अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे परिसरातील अनिकेत देशपांडे, मिलिंद कुलकर्णी, संजय पिंपळनेरकर, सुहासिनी कुलकर्णी, मंदार सहस्रबुद्धे आदी रहिवाशांनी डीबी स्टारकडे धाव घेतली. डीबी स्टारने वृत्त प्रकाशित करून या समस्येला वाचा फोडली. यानंतर नगरसेवक राजू वैद्य यांनीही हा रस्ता लवकर व्हावा यासाठी पाठपुरावा केला. अखेर महानगरपालिकेने रस्त्यासाठी 10 लाखांचा निधी मंजूर केला. आता डिव्हायडर होणेही तितकेच गरजेचे आहे.