आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Student Not Give Exam Due To Poor Road In Aurangabad City

औरंगाबादमधील खराब रस्त्यामुळे विद्यार्थ्याची गेली परीक्षेची संधी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - वेळेत हजर राहिला नाही अथवा एखादे कागदपत्र गहाळ झाले म्हणून परीक्षेपासून वंचित राहणारे अनेक विद्यार्थी सर्वांनीच पाहिले आहेत. मात्र, शनिवारी रस्त्यांच्या दुरवस्थेचा फटका परीक्षार्थींना बसला. खराब रस्ता आणि अडगळीत असलेले परीक्षा केंद्र शोधण्यात बराच वेळ गेल्याने अनेकांना परीक्षेपासून वंचित राहावे लागले.
देशभरातील राष्ट्रीयीकृत बँकांच्या प्रोबेशनरी अधिकारी पदासाठी शनिवारी परीक्षा होती. यंदा मराठवाड्यातून ४० ते ४५ हजार जण ही परीक्षा देत आहेत. ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन सत्रांत तीन तासांची ही परीक्षा सकाळी ९ ते १२ या वेळेत घेण्यात आली. शहराजवळील सावंगी रोड येथे देण्यात आलेले चंद्रलोप शिक्षण प्रसारक मंडळ संचालित औरंगाबाद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे ठिकाण अडगळीत आहे.
मुख्य रस्त्यावर एकच बोर्ड असून त्यावर दिशा दर्शवण्यात आली नाही. यामुळे नेमके जायचे कुठे, असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर होता. केंद्राचे अंतर लांब असल्याची कल्पना असल्याने तीन तास आधीच या सेंटरवर नंबर आलेले विद्यार्थी परीक्षेसाठी घरातून निघाले; परंतु पायवाटेप्रमाणे असलेला हा रस्ता खड्ड्यांचा असल्याने पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर साचले होते. अनेकांची गाडी या रस्त्यात फसल्याने वाट काढत, तर कुणी एकमेकांची मदत घेत कॉलेज गाठले खरे; परंतु पाच मिनिटे पोहोचण्यास वेळ झाला. रिपोर्टिंग टाइम आठ वाजेचा होता आणि ९ ते १२ ही वेळ पेपरची होती. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची परीक्षेची संधी हुकली. नियमाप्रमाणे ज्या ठिकाणी सुविधा आहेत, त्याच ठिकाणी परीक्षेचे केंद्र द्यावयास हवे, असे असतानाही जी जागा फारशी कुणाला माहीत नाही, असे केंद्र का देण्यात आले, असा प्रश्न विद्यार्थ्यांनी केला. हॉलतिकिटावर पत्ताही योग्य पद्धतीने देण्यात आलेला नव्हता.

रस्त्याने घालवली संधी

परीक्षेला वेळेवर पोहोचण्यासाठी तीन तास अगोदरच घरातून निघाले होते. मात्र, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे ही संधी गेली. अतिशय आत असलेले परीक्षा केंद्र शोधण्यात वेळ गेला. -धनश्री देशमुख, परीक्षार्थी