आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डीबी स्टार स्ट्रिंग: औरंगाबादेतील नगर भूमापनचा चिरीमिरी कारभार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'लोक सरकारी कार्यालयात कामासाठी जातात, आज-उद्या म्हणत भेट टाळली जाते, त्यानंतर कागदपत्रात उणिवा दाखवल्या जातात, पुन्हा टाळाटाळ आणि अखेर ‘सहकार्य’ करण्याचा उपाय सुचवला जातो. नगर भूमापन कार्यालयही अशा देवाण-घेवाणीच्या प्रकाराला अपवाद नाही. मात्र एक अपवाद घडला, तो म्हणजे चिरीमिरीला विरोध. डीबी स्टारकडे तक्रार करण्यात आली. त्यातूनच कागदपत्र देण्यासाठी कशी टाळाटाळ आणि अरेरावी केली जाते याचा पर्दाफाश झाला.'

नगर भूमापनच्या काही कर्मचारी व अधिकार्‍यांच्या मनमानीमुळे नागरिकांचा छळ होत आहे. या कर्मचार्‍याकडून त्या कर्मचार्‍याकडे पाठवले जाते. एका गृहिणीला महिनाभर अशीच टोलवाटोलवी करण्यात आली. डीबी स्टारने स्टिंग करून येथील सावळागोंधळ चव्हाट्यावर आणताच या गृहिणीला एका दिवसात पीआर कार्ड मिळाले. तीन दिवसांत मिळणारे पीआर कार्ड द्यायला महिना लावणार्‍या दोन कर्मचार्‍यांना नोटीस बजावण्यात आली आहे. शिवाय त्यांची दुसर्‍या विभागात नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र चिरीमिरी घेऊन काम करण्याची सवय आणि अरेरावीमुळे या विभागाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह लागले आहे. त्यामुळे नवोदित जिल्हाधिकार्‍यांनी कीड लागलेली ही व्यवस्था बदलणे गरजेचे आहे.

काय आहे नेमके प्रकरण : योगिता तोष्णीवाल यांनी विशालनगर भागातील र्शीरंगपुष्प अपार्टमेंटमध्ये एक फ्लॅट विकत घेतला होता. त्याचे पीआर कार्ड मिळवण्यासाठी नियमाप्रमाणे सगळी कायदेशीर कागदपत्रे घेऊन त्या पती बिपिन तोष्णीवाल यांच्यासह नगर भूमापन कार्यालयात गेल्या. सर्व कागदपत्रे दाखल केल्यानंतर त्यांना तीन दिवसांत पीआर कार्ड मिळायला हवे होते, पण 24 फेब्रुवारी रोजी अर्ज करूनही महिनाभर त्यांना चकरा माराव्या लागल्या. अभिलेखापालाच्या रेकॉर्ड रूममध्ये पीआर कार्ड जमा झाले नाही, असे नक्कल विभागातील उतारा लिपिक एच. सी. विश्वासू यांनी सांगितले तर नक्कल विभागात अभिलेखापाल संतोष जाधव यांच्याकडे पीआर कार्ड जमा केल्याचे परीरक्षण नगर भूमापक आर. के. जैस्वाल यांनी सांगितले. या टोलवाटोलवीला कंटाळून अखेर तोष्णीवाल यांनी डीबी स्टारकडे कैफियत मांडली.

कलेक्टर आला तरी.. : चमूने कार्यालय गाठले. तोष्णीवाल यांचे सहकारी म्हणून पीआर कार्ड देण्याची विनंतीही केली. त्यावर ‘तुम्हाला जिल्हाधिकार्‍यांकडे जायचे तर बिनधास्त जा, तक्रार केली तरी मी घाबरत नाही. रोज शंभर अर्ज येतात. आधीचे 700 अर्ज निकाली काढावयाचे बाकी आहे. दोन कर्मचार्‍यांवर नक्कल विभागाचा कारभार चालतो. जिल्हाधिकार्‍यांना माहिती आहे. त्यांना माणसे वाढवता येत नाही का’ असा सवाल उतारा लिपिक एच. सी. विश्वासू यांनी केला. ‘तुम्ही कलेक्टरकडे जा नाही तर आणखी कुणाकडे, मी पीआर कार्ड देणार नाही’, अशी धमकी देखील दिली.

परिरक्षण कार्यालयाचे नक्कल विभागाकडे बोट : नक्कल विभागात हा संवाद झाल्यानंतर समोरच असलेल्या कार्यालयातील परिरक्षण भूमापक आर. के. जैस्वाल यांच्याकडे चमू तोष्णीवाल यांच्यासह गेला. तेव्हा त्यांनी आमच्या रजिस्टरवर नावाची नोंद करून 22 जानेवारीलाच नक्कल विभागातील अभिलेखापाल संतोष म्हस्के यांच्या रेकॉर्ड रूममध्ये जमा केले आहे. यात आमची चूक नाही, असे जैस्वाल यांनी स्पष्ट केले.

परिरक्षक भूमापक आणि उतारा लिपिक आमने-सामने : चमूने पुन्हा नक्कल विभागात विश्वासू यांना पीआर कार्ड अभिलेखापाल संतोष म्हस्के यांच्याकडे जमा असल्याचे सांगितले. मात्र त्यांनी ही बाब मान्य केली नाही. त्यानंतर जैस्वाल यांना घेऊन चमू विश्वासू यांच्याकडे गेल्यानंतर दोघात जोरदार शाब्दिक चकमक झाली. अखेर कार्ड जमा असल्याचे जैस्वाल यांनी सिद्ध करून दाखवले. आता मात्र संगणकात नोंद करण्यासाठी कर्मचारी नसल्याचे सांगत विश्वासू यांनी तीन दिवसांनंतर या असे सांगितले. त्यावर चमूने रमेश नावाच्या दलालाकडे तुमची ‘सोय’ केल्याचे सांगताच पंधरा मिनिटे थांबा आणि लगेच घेऊन जा, असे उत्तर त्यांनी दिले.

तत्कालीन जिल्हाधिकारीही चाट पडले : पूर्ण दिवस या प्रकरणाचा तपास केल्यानंतर तत्कालीन तत्कालीन प्रभारी जिल्हाधिकारी किसनराव लवांडे यांना चमूने या कारभाराची संपूर्ण रेकॉर्डिंग ऐकवली. तेव्हा ते देखील थक्क झाले. त्यांनी या प्रकरणी तत्काळ चौकशी करण्याचे आदेश जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख अधिकारी एम. ए. सय्यद यांना देताच अर्जदार तोष्णीवाल यांना लगेच दुसर्‍या दिवशी पीआर कार्ड देण्यात आले. महिन्यापासून चकरा मारणार्‍या तोष्णीवाल यांचे काम अखेर झाले. मात्र असे किती लोक विभागाच्या या कारभारामुळे त्रस्त असतील. त्यामुळे यावर जिल्हाधिकार्‍यांनी कडक उपाययोजना करणे गरजेचे आहे.

दोघांना नोटीस : पीआर कार्डची नक्कल अर्जदाराला एका दिवसात मिळायला हवी होती. या कामासाठी एक महिना लावणारा उतारा लिपिक विश्वासू, परिरक्षक भूमापक जैस्वाल यांना कारणे दाखवा नोटीस पाठवा, या कार्यालयातून त्यांना तत्काळ प्रतिनियुक्तीवर दुसरीकडे पाठवा, त्यांच्या जागी तीन माणसे तत्काळ वाढवा आणि अहवाल सादर करा, असे स्पष्ट आदेश सय्यद यांनी नगर भूमापन अधिकारी टी. आर. साळवे यांना दिले आहेत.

दोषींवर कारवाई करणार
>शासकीय नियमानुसार पीआर कार्डची नक्कल एका दिवसात द्यायला हवी. काही तांत्रिक अडचणी असतील तर जास्तीत जास्त 3 दिवस लागायला हवे. चौकशीनंतर दोषी आढळणार्‍यांवर कडक कारवाई करू.
>किसनराव लवांडे, अपर जिल्हाधिकारी

सूचना फलक लावणार
>या दोन कर्मचार्‍यांना दुसर्‍या टेबलवर पाठवण्यात आले आहे. दोषी कर्मचार्‍यांना महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 मधील तरतुदीनुसार कारवाई करणार. 3 दिवसांत कार्डची नक्कल मिळत नसल्यास कार्यालयीन प्रमुखांकडे तक्रार करण्याची सूचना करणारा फलक लावला जाईल.
-एस. ए. सय्यद, भूमी अभिलेख अधिकारी

कारवाई निश्चित होणार
>सुट्या आल्याने नोटिसा पाठवण्यात अडचण आली. तत्पूर्वी या कार्यालयातून प्रतिनियुक्तीवर दुसर्‍या कार्यालयात त्यांना त्याच दिवशी पाठवण्याचे आदेश दिले.
- टी. आर. साळवे, नगर भूमापन अधिकारी