आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad City Unplanned Development Is Dangerous

शहराच्या बेबंद वाढीला लगाम आवश्यक - आर्किटेक्ट अजय कुलकर्णी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - चारशे वर्षांपूर्वी मलिक अंबरने वसवलेल्या या नियोजनबद्ध शहराच्या विकासाला सध्या निश्चित अशी दिशा राहिलेली नाही. चारही बाजूने अंदाधुंद वाढत चाललेले शहर असे स्वरूप प्राप्त झाले आहे. या बेबंद वाढीला वेळीच लगाम घालण्यात आला नाही तर ऐतिहासिक वारसा सांगणार्‍या या शहराचे रूपांतर सिमेंटच्या जंगलात होईल, अशी भीती प्रसिद्ध आíकटेक्ट अजय कुलकर्णी यांनी व्यक्त केली.

शहरात सुरू असणारी पाडापाडी निर्थक असून केवळ गाड्या घुसवण्यासाठी शहराची पाडापाडी करणे योग्य नाही. त्याऐवजी मुख्य शहर पादचार्‍यांसाठी राखीव ठेवले तर अनेक अडचणी सुटू शकतील, असे परखड मतही त्यांनी व्यक्त केले. शुक्रवारी एका महाविद्यालयातील कार्यशाळेत भाग घेण्यासाठी शहरात आले असता त्यांनी ‘दिव्य मराठी’शी बातचीत केली. ते म्हणाले, शहराच्या विविध बाजूंना सांस्कृतिक केंद्रे, बाजारपेठा, औद्योगिकीकरण यांचा ठरवून विकास केला जावा. औरंगाबाद शहराच्या मध्यवर्ती भागात वाहतुकीला बंदी घालून हा भाग केवळ पादचार्‍यांसाठी राखीव ठेवला तरच या शहराची सुंदरता कायम राहील, असे मतही त्यांनी व्यक्त केले. औरंगाबाद 2020 चा शहर विकास आराखडा आपण महापालिकेकडे नुकताच सादर केला असून त्यात या सर्व बाबी स्पष्टपणे नमूद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. शहर सुनियोजित असावे. केवळ सिमेंटचे ठोकळे उभा करणे म्हणजे शहराचा विकास किंवा वाढ नाही. विकसित शहरात समाजातील प्रत्येक वर्गाचा विचार होणे आवश्यक आहे.

नहर-ए-अंबरीचे पाणी भागवू शकते तहान
जमिनीत पाणी शोधण्यासाठी शेकडो फूट बोअर खोदले जात आहेत. अशा प्रकारामुळे जमिनीची चाळणी होत आहे. चारशे वर्षांपूर्वी मलिक अंबरने हा विचार करून जमिनीत खोल न जाता पाण्याचे अनेक झरे एकत्र करून नहरी तयार केल्या. जगात अशा नहरी असलेले हे एकमेव शहर आहे. शहराजवळील डोंगरदर्‍याचे पाणी एकत्र करून पाण्याची व्यवस्था केली. मात्र, एवढी सक्षम व्यवस्था लयास गेली आहे. ज्याप्रमाणे शहरातील ऐतिहासिक वास्तू जतन करण्याचे काम महापालिकेने केले त्याच पद्धतीचे काम या नहरी वाचवण्यासाठी होणे आवश्यक आहे. आजही 25 टक्के शहराची तहान या नहरीद्वारे भागवता येणे शक्य असल्याचे मत कुलकर्णी यांनी व्यक्त केले.